भीषण अपघात – भरधाव वेगाने जाणारी कार व दुचाकीची एकमेकांना धडक ; खान्देशातील ३ मित्र ठार !
धुळे खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – राज्यातील अनेक ठिकाणी अपघाताच्या घटना सातत्याने घडत असताना नुकतेच धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यातील बोराडी ते मालकातर दरम्यान १० सप्टेंबर रोजी भरधाव वेगाने जाणारी कार आणि दुचाकी एकमेकांना धडकल्याने झालेल्या अपघातात तीन जण गंभीर जखमी झाले. उपचार सुरू असताना तिघांचाही मृत्यू झाला.
याबाबत सविस्तर वृत्तांत असे की, शिरपूर तालुका पोलिस ठाण्यात बुधवारी गुन्हा दाखल झाला आहे, शिरपूर तालुक्यातील बोराडी ते मालकातर रोडवर रामपुरा गावाच्या फाट्याजवळ १० सप्टेंबर रोजी दुपारी साडेतीनच्या सुमारास अपघाताची ही घटना घडली. एमएच ०४ ईएक्स ३६२५ क्रमांकाची कार आणि एमपी ४६ एमजे ६८४८ क्रमांकाची दुचाकी यांच्यात अपघात झाला. यात बाळू सखाराम पावरा (वय ४५, रा. लंगडीभवानी, ता. शहादा), दारासिंग तेरसिंग पावरा उर्फ जाधव (वय ५१, रा. चांदसिलिया ता. शहादा) आणि प्रताप रामजी पावरा (वय ६८, रा. लंगडीभवानी ता. शहादा) यांना गंभीर दुखापत झाली होती. तिघा जखमींवर उपचार सुरू असताना एका पाठोपाठ एक तिघांचाही मृत्यू झाला. याप्रकरणी कार चालकाविरोधात शिरपूर तालुका पोलिस ठाण्यात बुधवारी गुन्हा दाखल झाला आहे.