भुसावळातील एमओएचचा आविष्कार : रेल्वेतील महिला व पुरुष चालकांसाठी इंजिनातच केली वॉटरलेस युरीनलची सोय
भुसावळ खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – रेल्वेच्या प्रगतीत महत्वपूर्ण भूमिका निभावणाऱ्या महिला वा पुरुष रेल्वे लोकोपायलट (चालक) यांना कर्तव्यावर असताना लघूशंका अथवा शौचास आल्यास त्यांच्यासाठी ही बाब मोठी गैरसोयीची ठरत होती. वेळप्रसंगी रेल्वे थांबवून त्यांना नैसर्गिक विधी करावा लागत होता. मात्र या समस्येवर आता भुसावळच्या इलेक्ट्रिक लोको शेड (एमओएच) ने मात केली आहे. नव्याने बनवलेल्या लोकोमोटिव मध्ये वॉटरलेस युरिनलचे निर्माण करण्यात आले असून त्याचे उद्घाटन विभागीय रेल्वे व्यवस्थापक ईती पाण्डेय यांच्या हस्ते मंगळवार 20 रोजी करण्यात आले.
भारतीय रेल्वेच्या कर्मचाऱ्यांसाठी ही महत्त्वाची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. नवीन लोकोमोटिवमध्ये वॉटरलेस युरिनलची सोय करण्यात आल्याने पुरुष व महिला क्रू कर्मचाऱ्यांना ड्युटी दरम्यान वॉशरूमचा वापर अधिक सुलभ होणार आहे. पुरुष आणि महिला दोघांसाठी उपयुक्त एसएस कमोड डिझाईन बनवण्यात आले आहे. याप्रसंगी अपर मंडल रेल्वे व्यवस्थापक सुनील कुमार सुमन आणि संबंधित शाखेचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.