भुसावळातून डिझेलची चोरी : मुक्ताईनगरात डिझेलचोरांना अटक!
भुसावळ खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – भुसावळातून डिझेलची चोरी करून मध्य प्रदेशाकडे पळणाऱ्या चोरट्यांना मुक्ताईनगर पोलिसांनी सिनेस्टाइलने अटक केली. पोलिसांच्या सापळ्यात तिघे अडकले आहेत. त्यांच्याकडून ४०० लिटर डिझेल जप्त करण्यात आले आहे.
याबाबत सविस्तर वृत्तांत असे की, शुक्रवारी पहाटे काही चोरटे कारमधून ४०० लिटर डिझेल भरून भुसावळहून पळाले. ही माहिती भुसावळ पोलिसांकडून मुक्ताईनगर पोलिस ठाण्याचे निरीक्षक नागेश मोहिते यांना मिळाली. चोरी करणारे मध्यप्रदेशाकडे जाण्याची शक्यता ओळखून त्यांनी मुक्ताईनगर चौकात नाकाबंदी करण्याचा आदेश दिला. पोलिस कर्मचारी सोपान वंजारी यांनी तातडीने कार्यवाही करत या ठिकाणी एक ट्रक रस्त्यावर आडवा लावला. यामुळे चोरट्यांना पकडने पोलिसांना सोपे झाले.मुक्ताईनगर येथे पोलिसांनी रस्त्यावर ट्रक आडवा लावल्यामुळे समांतर रस्त्यावरून वेगाने येणारी चोरट्यांची गाडी थेट ट्रकला धडकली. त्यानंतर वंजारी यांनी तिघांना ताब्यात घेतले आणि डिझेलसह कार जप्त केली. डिझेलचोरीचा गुन्हा भुसावळ तालुका पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडल्याने, अटक केलेल्या तिन्ही संशयितांना पुढील कारवाईसाठी भुसावळ तालुका पोलिसांकडे सुपुर्द करण्यात आले आहे.