भुसावळात एक्स्प्रेसमधून १ लाखाचा गांजा जप्त !
भुसावळ खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – पुरीहून अहमदाबादकडे निघालेल्या एक्स्प्रेसमध्ये रेल्वे सुरक्षा बलाला बेवारस बॅगेत तब्बल १ लाख रुपयांचा १० किलो गांजा आढळल्याने खळबळ उडाली आहे. हा प्रकार मंगळवारी रात्री समोर आल्यानंतर पुन्हा गांजा तस्करी ऐरणीवर आली आहे
याबाबत सविस्तर वृत्तांत असे की, अज्ञात प्रवाशाविरोधात लोहमार्ग पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यात आला असून आता गांजा तस्कराला शोधण्यास सुरूवात केली आहे. २८ जानेवारीला पुरी-अहमदाबाद १२८४३ या गाडीच्या पुढील जनरल डब्यात एक बेवारस बॅग आढळली. यानंतर एका प्रवाशाने भुसावळ स्थानक आल्यानंतर ८.३५ वाजता आरपीएफकडे ही बॅग दिली. सीसीटिव्ही व पंचासमक्ष बॅगेची झडती घेतली असता पिवळ्या रंगाच्या कपड्यात सफल पान मसाला लिहिलेले दोन बंडल आढळले.भुसावळ रेल्वे सुरक्षा बलाचे निरीक्षक आर. पी. मीना यांच्या उपस्थितीत आरपीएफने कपड्यातून बंडल बाहेर काढल्यानंतर त्यात गांजा आढळला.
या वेळी सहायक सुरक्षा स्टेशन अधिकारी शकील खान उपस्थित होते. १० किलो २९३ ग्रॅम वजनाच्या या गांजाची बाजारातील किंमत १ लाख २ हजार ९३० रूपये आहे. बुधवारी लोहमार्ग पोलिसांत या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस निरीक्षक सुधीर धायरकर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.