भुसावळ पालिकेच्या थकबाकीदार एजन्सीच्या ७ बॅनर होर्ग्डिंग्जवर फिरवला जेसीबी !
भुसावळ खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – भुसावळ शहरातील १७ एजन्सी धारकांकडे पालिकेची तीन वर्षांपासून सुमारे २५ लाखांची थकबाकी वाढली असून वारंवार सूचना देवूनही संबंधित थकबाकी भरत नसल्याने तसेच स्ट्रक्चरल ऑडीटचा रिपोर्टही देत नसल्याने सोमवार, ९ पासून अशा एजन्सीच्या फलकांवर पालिकेने कारवाईला सुरूवात केली आहे.
याबाबत सविस्तर वृत्तांत असे की, सोमवारी सकाळी ११ वाजता यावल रोडवरील महात्मा गांधी पुतळ्याजवळील जमील पटेल यांच्या ईगल अॅडव्हटायझर्स एजन्सीच्या सात फलकांवर जेसीबीद्वारे कारवाई करण्यात आल्याची माहिती पालिका सूत्रांनी दिली. दरम्यान, मंगळवार, १० रोजीदेखील पोलीस बंदोबस्तात ही कारवाई केली जाणार आहे.शहरात अनधिकृत होर्डीग व बॅनरमुळे शहराचे विद्रूपीकरण वाढले असताना शहरातील विविध
भागातील ४५ होर्डिंग्जद्वरे पालिकेला दरवर्षी १८ लाखांचे उत्पन्न मिळते मात्र त्यातही अनेक एजन्सीधारकांनी तीन वर्षांपासून पालिकेचा कर थकवला असून १७ एजन्सीधारकांकडे तब्बल २५ लाखांची थकबाकी आहे. त्यापैकी एकाच एजन्सीधारकाकडे २२ लाख २५ हजार ९०३ रुपयांचा कर थककवला आहे. संबंधित एजन्सी चालकाला स्ट्रक्चरल ऑडीट रिपोर्ट सादर करण्याच्या सूचना देवूनही त्यांनी सूचनेची न घेतल्याने शहर पोलिसांकडील बंदोबस्तात सोमवारी सात बड्या होडिरंगवर कारवाई करण्यात आली. या कारवाईने थकबाकीदार एजन्सीच्या गोटात प्रचंड खळबळ उडाली.
दरम्यान, ही कारवाई भुसावळ पालिकेचे प्रशासक व प्रांताधिकारी जितेंद्र पाटील, मुख्याधिकारी राजेंद्र फातले यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासकीय अधिकारी अनिल आहुजा, पालिका लिपिक अनिल भाकरे, गोपाल पाली, राजीव चौधरी, धर्मेंद्र खरारे तसेच अग्निशमन विभाग व आरोग्य विभागाचे 15 कर्मचाऱ्यांच्या सहभागाने करण्यात आली.