भुसावळातील राजकीय पक्षाच्या तालुकाध्यक्षांच्या रुग्णवाहिकेत तपासणी दरम्यान आढळले चोरीचे साहित्य.
पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल.
भुसावळ खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी तालुक्यातील औष्णिक वीज निर्मिती केंद्रातील नवीन ६६० मेगावॉट प्रकल्पातून भुसावळ येथील एका राजकीय पक्षाच्या तालुकास्तरावरील अध्यक्षाच्या खाजगी रुग्णवाहिकेतून चोरीचे साहित्य घेऊन जात असताना एम.एस.एफ च्या जवानांनी रंगेहाथ पकडल्याची घटना काल दि.१२ रोजी दुपारी साडेबारा वाजता दीपनगर येथील नवीन ६६० मेगावॉट प्रकल्पातील मुख्य प्रवेशद्वार येथे घडली.यामुळे संपूर्ण भुसावल तालुका मोठी खळबळ उडाली आहे.
याबाबत तालुका पोलिसांनी दिलेली माहिती अशी की दीपनगर येथील नवीन ६६० मेगावॉट प्रकल्पातून भेल कंपनीच्या मालकीचे साहित्य रुग्णवाहिका क्रमांक एम.एच.१५ जी.व्ही.६७१६ या वाहनातून चालक शशीकांत भागवत चौधरी वय ४९ राहणार फुलगाव तालुका भुसावळ हा चोरीचे साहित्य घेऊन जात
असताना त्याला दुपारी साडेबारा वाजता एम.एस.एफ सहाय्यक सुरक्षा अधिकारी प्रविण खैरे,रोहिदास महाजन,विनोद पवार,प्रविण पाटील या जवानांनी रंगेहाथ पकडले.सदर रुग्णवाहिकेतून ५००० हजार रुपये किंमतीचे १० फायबर टाकी, १८०० रुपये किंमतीचे नट बोल्ट,६४० रुपये चे लहान नट बोल्ट,४००० रुपये किंमतीचे एक लोखंडी प्लेट,४०० रुपये किंमतीचा एक लोखंडी पाईप,१२० रुपयेचे एक लहान लोखंडी पाईप,४०० रुपये किंमतीचे एक सी चॅनल, ४८० रुपये किंमतीचे अँगल,१२० रुपये एक लहान अँगल असे एकूण १२९६० रुपये किंमतीचे साहित्य तसेच २० लाख रुपये किंमतीचे रुग्णवाहिका असे एकूण २० लाख १२ हजार ९६० रुपये किंमतीचे साहित्य चोरून घेऊन जात होता.याबाबत तालुका पोलिस ठाण्यात एम.एस.एफ चे जवान प्रविण पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून नुसार शशीकांत भागवत चौधरी यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलिस निरिक्षण महेश गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास उपनिरीक्षक मंगेश दराडे करीत आहे.