भुसावळ येथे नवजीवन एक्स्प्रेसमध्ये धाडसी चोरी; परप्रांतीय त्रिकूटांच्या टोळीला अटक !
भुसावळ खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – नवजीवन एक्स्प्रेसमधील महिला प्रवासी झोपल्याची संधी साधून भामट्यांनी पर्स लांबवली होती. या पर्समध्ये 80 हजारांच्या रोकडसह सहा लाख 32 हजारांचा ऐवज लंपास केला होता.लोहमार्ग पोलिसात तक्रार दाखल झाल्यानंतर सीसीटीव्हीद्वारे संशयीत निष्पन्न झाले मात्र त्यांचा ठावठिकाणा गवसत नव्हता.त्यातच संशयीत पुन्हा जनता एक्स्प्रेसमध्ये चोरीच्या उद्देशाने भुसावळात येताच त्यांच्या हाती भुसावळातील रेल्वे सुरक्षा बलासह लोहमार्ग पोलिसांनी संयुक्त कारवाईत बेड्या ठोकल्या आहे .
याबाबत सविस्तर वृत्तांत असे की, आरोपींकडून 18 लाख सहा हजार 189 रुपयांचे दागिणे जप्त करण्यात आले.
रमजान खान हुसेन खान (35, दुधिया तहसील, नेपानगर), तौसीफ खान चिन्मन खान (22, केरपानी, नेपानगर) व मुस्ताक खान मुस्तफा खान (18, दुधिया तहसील, नेपानगर) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत.अटकेनंतर रेल्वेतील आणखी काही गुन्हे उघडकीय येण्याची शक्यता आहे.दिलीपकुमार प्रथापचंद जैन (57, कापुस्ट्रीट नेल्लोर सिटी, आंध्रप्रदेश) हे 30 जानेवारी 2024 रोजी ट्रेन 12655 नवजीवन एक्सप्रेसच्या वातानुकूलित बोगी ए-2 च्या बर्थ क्रमांक 19 व 20 वरून अहमदाबाद ते नेल्लोर असा प्रवास पत्नीसह करीत होते.भुसावळ येथून गाडी सुटताच त्यांच्या पत्नीची पर्स लांबवण्यात आली. या पर्समध्ये 80 हजारांची रोकड, दोन नेकलेस सेट, दोन इअरिंग सेट, तीन अंगठ्या, एक हात कंगन, बँगल सेट, मोबाईल मिळून एकूण सहा लाख 32 हजारांचा ऐवज चोरीस गेला होता.नेल्लोर येथे प्रवाशाने तक्रार दिल्यानंतर हा गुन्हा तपासार्थ भुसावळात वर्ग झाला. लोहमार्ग पोलिसांनी घटनेच्या दिवशीचे फुटेज पाहिल्यानंतर त्रिकूट गाडीतून उतरताना स्पष्ट झाल्यानंतर त्यांचा शोध सुरू करण्यात आला.चोरीच्या सुमारे महिनाभरानंतर 4 फेब्रुवारी रात्री दिड वाजता टोळीतील तिन्ही सदस्य जनता एक्स्प्रेसमध्ये चढताच खास खबऱ्यांनी यंत्रणेला अलर्ट केल्यानंतर तीन्ही संशयीतांना चौकशीकामी ताब्यात घेण्यात आले. आरोपींना घटनेच्या दिवशीचे फुटेज दाखवल्यानंतर त्यांनी नवजीवन एक्स्प्रेसमध्ये चोरी केल्याची कबुली दिली.अटकेतील तीन्ही चोरट्यांनी सुरतपासून जनरल तिकीटावर प्रवास सुरू करीत प्रवासात स्लीपरमध्ये तिकीट निरीक्षकाशी संधान साधत बर्थ मिळवला व जळगाव स्थानक सुटल्यानंतर आरोपी गाडीतून एसी कोचमध्ये शिरले व प्रवासी झोपले असल्याची संधी साधून त्यांनी महिलेची पर्स लांबवली.आरोपींनी 80 हजारांची रोकड वाटून घेतली तर तक्रारदाराने तक्रार देताना जुन्या किंमतीनुसार सोन्याची रक्कम नोंदवल्याने सहा लाख 32 हजारांची चोरी समोर आली होती. प्रत्यक्षात 275 ग्रॅम वजनाचे दागिणे चोरीला गेल्यानंतर आरोपींच्या अटकेनंतर त्यांच्याकडून 238 ग्रॅम सोने हस्तगत करण्यात आले. आरोपींना सुरूवातीला 4 ते 7 दरम्यान तीन दिवसांची पोलीस कोठडी मिळाली तर 7 रोजी पुन्हा एका दिवसांची पोलीस कोठडी रेल्वे न्यायालयाने सुनावली.
दरम्यान, ही कारवाई लोहमार्ग पोलीस अधीक्षक स्वाती भोर, उपविभागीय पोलीस अधिकारी सुर्यकांत बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली भुसावळ लोहमार्ग पोलीस निरीक्षक सुधीर धायरकर, सहा. निरीक्षक किसन राख, भुसावळ रेल्वे सुरक्षा बलाचे निरीक्षक पांचुराम मीना, रेल्वे सुरक्षा बल गुन्हे शाखेचे निरीक्षक दयानंद यादव यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रगटीकरण पथकातील लोहमार्गचे हवालदार जयकुमार रमेश कोळी, रवींद्र पाटील, दिवानसिंग राजपुत, धनराज लुले, विलास जाधव, बाबू मिर्झा तसेच रेल्वे सुरक्षा बल भुसावळचे प्रधान आरक्षक महेंद्र कुशवाह, दीपक सिरसाठ, ईमरान खान यांच्या पथकाने केली. तपास हवालदार जयकुमार रमेश कोळी करीत आहेत.