मंडळातील लोकांवर चालून येत मारहाण….दहशत निर्माण केल्याप्रकरणी ६७ जणांविरुद्ध गुन्हा दाखल !
यावल खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – यावल तालक्यातील बामणोद येथे मागील भांडणाच्या कारणावरुन दहशत निर्माण करुन शिवीगाळ व दमदाटी केल्याप्रकरणी ६७ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणी पाच जणांना अटक करण्यात आली आहे. ही घटना ९ रोजी रात्री घडली होती.
याबाबत सविस्तर वृत्तांत असे की, बामणोद येथील फिर्यादी हे देवी मंडळात नारळ देवून देवीला हार घालण्यासाठी व हार घेण्यासाठी मनुमा मेडिकल जवळील विठ्ठल मंदिरासमोरुन जात होते. या वेळी बामणोदमधील एका समुदायाने हातात कुऱ्हाड, चाकू कोयता, काठया, दगड, विटा घेवून फिर्यादीजवळ येवून दहशद निर्माण केली. तसेच तीन दिवसांपूर्वी झालेल्या भांडणाचे कारण पुढे करुन दहशत निर्माण करण्यासाठी जमाव जमवला. तसेच मंडळातील लोकांवर चालून येत मारहाण करुन शिवीगाळ, दमदाटी केल्याची ही घटना ९ रोजी रात्री घडली होती. याप्रकरणी फैजपूर पोलिसांत ६७ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी बामणोद येथील सुरेश नामदेव केदारे (वय ४८), लहु अशोक केदारे (वय ३८), गोपाळ नथ्थू केदारे (वय ३६), गोकुळ विजय केदारे (वय ३१), संजय विजय केदारे (वय ३४), रोहित नितिन केदारे (वय २१) यांना अटक करण्यात आली आहे.
दरम्यान, उर्वरित संशयित फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. या घटनेचा तपास सहायक पोलीस अधीक्षक अन्नपूर्णा सिंह, सहाय्यक पोलीस निरीक्षक रामेश्वर मोताळे यांच्या मार्गदर्शनात पो.उ.नि. नीरज बोकील करत आहेत. दरम्यान, ही माहिती मिळताच वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिल्या असून बामणोद येथे चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. सध्या गावात शांतता आहे.