महावितरण कंपनीच्या पोलला स्पर्श लागल्याने युवकाचा मृत्यू !
एरंडोल खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – महात्मा फुले यांच्या जयंतीनिमित्त पुतळा शुशोभिकरण करण्यासाठी मंडप उभारण्यात आला होता. त्यावेळी पुतळ्या सभोवताली उभारण्यात आलेल्या मंडपाला अचानक आग लागल्याने पंकज गोरख महाजन (वय ३२) याने तात्काळ आग विझविण्याचा प्रयत्न करीत असताना मंडपाच्या बाजूला असलेल्या महावितरण कंपनीच्या पोलला त्याचा स्पर्श झाल्यामुळे पंकज महाजन या तरुणाला जबर शॉक लागला. त्यामुळे तो खाली फेकला गेल्याची घटना १० रोजी रात्री ११.४५ वाजेच्या सुमारास घडली.यावेळी उपस्थित तरूणांनी त्याला तातडीने ग्रामीण रुग्णालयात पुढील उपचारासाठी दाखल केले.
याबाबत सविस्तर वृत्तांत असे की, डॉक्टरांनी पंकज महाजन याला तपासले असता मृत घोषित केले. या घटनेमुळे परिसरात सर्वत्र स्मशान शांतता पसरली. तसेच महात्मा फुले युवा क्रांती मंच यांच्यावतीने आयोजित सर्व कार्यक्रम तात्काळ रद्द करण्यात आले.विशेष म्हणजे पंकज महाजन या तरुणाच्या मोबाईलचे स्टेटस मनाला चटका लावणारे होते. त्याच्या स्टेटसमधे ‘तेरे दरबार में आना मेरा काम है, मेरी बिगडी बनाना तेरा काम है ‘ असे व्हाट्सअप स्टेटस हे अखेरचे स्टेटस ठरले. पंकज महाजन हा तरुण सामाजिक कार्यात सक्रिय सहभाग घेत होता. पंकजच्या अशा अचानक जाण्याने कुटुंबियांना मोठा धक्का बसला आहे. त्याच्या पक्षात आई-वडील, भाऊ, पत्नी व तीन मुली असा परिवार आहे. याप्रकरणी एरंडोल पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास एरंडोल पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक निलेश गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली हे.काॅ.विलास पाटील करीत आहेत.