महिलेला भागीदारांनी केली जबर मारहाण ; सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल !
जळगाव खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – भागीदारीमध्ये घेतलेल्या कार्यालयाचे कागदपत्र हवे असल्यास स्टॅम्पवर लिहून द्या, असे सांगितल्याने दीपाली बाळू सुरवाडे (३३, रा. मन्यारखेडा शिवार) यांना तीन महिलांसह एकूण सहा जणांनी मारहाण केली. तर एका महिलेने बोटाला चावा घेत दुखापत केली. ही घटना १३ एप्रिल रोजी दीपाली यांच्या घरी घडली. याप्रकरणी नशिराबाद पोलिस ठाण्यात सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सविस्तर वृत्तांत असे की, जळगावात भागीदारीत घेतलेल्या कार्यालयावरून वाद आहे. त्यात पांडुरंग ठाकरे, दगड्डू गवळे, रवींद्र दगडू गवळे, मनीषा दिनेश गवळे, शांताबाई दगडू गवळे, पूजा रवींद्र गवळे हे (सर्व रा. मेहरुण) १३ एप्रिल रोजी दीपाली सुरवाडे यांच्या घरी गेले. तेथे त्यांना कार्यालयाची कागदपत्रे मागितली. सुरवाडे यांनी स्टॅम्प आणून त्यावर लिहून द्या, असे सांगितले. त्याचा राग आल्याने त्यांना मारहाण करण्यात आली. त्यात मनीषा गवळे यांनी महिलेच्या बोटाला चावा घेतला. मारून टाकण्याचीही धमकी देण्यात आली. याप्रकरणी दीपाली सुरवाडे यांनी नशिराबाद पोलिसात फिर्याद दिली.