मुक्ताईनगर हिरो शोरूमवर बनावट ट्रेड सर्टिफिकेट प्रकरण: कठोर कारवाईची मागणी
मुक्ताईनगर खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – शहरातील ओम श्री मोटर्स हिरो शोरूमवर बनावट ट्रेड सर्टिफिकेटच्या आधारे दुचाकी विक्री आणि सर्व्हिसिंग सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी श्रावण काशिनाथ धाडे यांनी प्रादेशिक परिवहन विभाग जळगाव आणि परिवहन आयुक्त, मुंबई यांच्याकडे तक्रार अर्ज दाखल केला असून, तात्काळ कठोर कारवाईची मागणी करण्यात आली आहे.
आरटीओ पथकाची तपासणी आणि संशयास्पद भूमिका
मुक्ताईनगरमध्ये आरटीओ पथकाने हिरो शोरूमवर धाड टाकली असता, शोरूममधील दुचाकी वाहनांची चेसिस क्रमांक नोंदवून घेण्यात आली. तसेच, अधिकाऱ्यांनी ट्रेड सर्टिफिकेटची मागणी केली असता, शोरूम मालकाने चौधरी मोटर्स या नावाने ट्रेड सर्टिफिकेट सादर केले. मात्र, या दस्तऐवजाची योग्य चौकशी न करता आरटीओ पथकाने तात्काळ शोरूममधून काढता पाय घेतल्याने नागरिकांमध्ये प्रचंड रोष निर्माण झाला आहे.
बनावट ट्रेड सर्टिफिकेटचा गंभीर आरोप
तक्रार अर्जानुसार, सदर ट्रेड सर्टिफिकेट गट क्रमांक 576 व प्लॉट क्रमांक 3/1 या पत्त्यावर नोंदणीकृत आहे. मात्र, त्या जागेवर 28 मार्च 2021 पासून एचडीएफसी बँक आणि सप्टेंबर 2022 पासून मल्टी को-ऑपरेटिव्ह बँक राजश्री शाहू सुरू आहे. त्यामुळे या शोरूमला हे सर्टिफिकेट कसे आणि कोणत्या आधारे रिन्यूअल करण्यात आले, हा मोठा प्रश्न उपस्थित झाला आहे.
वास्तविक शोरूमचे स्थान आणि अनधिकृत व्यवसाय
तक्रारकर्त्यांच्या म्हणण्यानुसार, ओम श्री मोटर्स हिरो शोरूम गट क्रमांक 561/1/2/38 ब या स्थळी सुरू असून, सदर जागा जितेंद्र सरोदे यांची मालकी आहे. मात्र, शोरूम दुसऱ्या पत्त्यावरील बनावट ट्रेड सर्टिफिकेटच्या आधारे सुरू असल्याचा संशय असून, हे सर्रासपणे ग्राहकांची फसवणूक करण्याचा प्रकार आहे.
वाहनधारकांचे आर्थिक शोषण थांबणार कधी?
या प्रकरणानंतर फक्त हिरोच नव्हे, तर होंडा, बजाज आणि इतर दुचाकी शोरूम देखील अनधिकृतपणे सुरू असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे संपूर्ण तालुका आणि जिल्ह्यातील अशा बोगस शोरूमवर तात्काळ कारवाई करून ग्राहकांचे आर्थिक शोषण थांबवण्याची मागणी होत आहे.
तक्रार कोणाकडे आणि काय कारवाईची मागणी?
सदर प्रकरणाची चौकशी आणि कठोर कारवाई करण्याची मागणी प्रादेशिक परिवहन अधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक आणि परिवहन आयुक्त मुंबई यांच्याकडे करण्यात आली आहे.
तक्रारकर्त्याने खालील मागण्या केल्या आहेत:बनावट ट्रेड सर्टिफिकेटचा संपूर्ण अहवाल सादर करावा.मुक्ताईनगरसह संपूर्ण जिल्ह्यातील बोगस शोरूमवर छापे टाकून योग्य ती कारवाई करावी.ग्राहकांची फसवणूक थांबवण्यासाठी अशा शोरूमच्या लायसन्स रद्द कराव्यात.अनधिकृत वाहन विक्री रोखण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित करून चौकशी करावी.मुक्ताईनगरमधील या घटनेमुळे प्रशासनाची कार्यपद्धती आणि भ्रष्टाचारावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. सामान्य ग्राहकांची होणारी फसवणूक थांबवण्यासाठी त्वरित कठोर कारवाई होणे गरजेचे आहे. आता प्रशासन जागे होणार का? की पुन्हा एकदा प्रकरण दडपले जाणार? हे येत्या काळात स्पष्ट होईल.