मुलाचे लग्न आटोपून ट्रॅव्हल्सने घरी परतणाऱ्या महिलेचे साडेचार लाखांचे दागिने लंपास !
जळगाव खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – मुलाचे लग्न आटोपून पुण्याहून ट्रॅव्हल्सने घरी परतणाऱ्या आशा विकास कुलकर्णी (वय ५०, रा. त्र्यंबकनगर) यांच्या बॅगेतून प्रवासात ४ लाख ३२ हजार रुपये किमतीचे दागिने चोरी झाले. ही घटना दि. १६ ते दि. २३ फेब्रुवारीदरम्यान घडली. महिनाभरानंतर हा प्रकार लक्षात आल्याने या प्रकरणी दि. २४ मार्च रोजी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सविस्तर वृत्तांत असे की, शहरातील त्र्यंबकनगरात आशा कुलकर्णी या वास्तव्यासय आहेत. त्यांचा मुलगा पुणे येथे नोकरीला असून त्याचे पुणे येथे लग्न कुलकर्णी दाम्पत्य पुणे येथे गेले होते. दि. ७ फेब्रुवारी रोजी लग्न झाल्यानंतर महिलेने २ लाख रुपये किमतीचे मंगळसूत्र, २ लाखाच्या पाटल्या, ३२ हजार ५०० रुपयांचे कर्णफुले असा एकूण ४ लाख ३२ हजार ५०० रुपयांचे दागिने एका बॅगमध्ये ठेवून ते मुलाच्या घरी ठेवले होते. त्यानंतर ते इतरत्र गेले होते. दि. २३ फेब्रुवारी रोजी ते खासगी ट्रॅव्हल्सने जळगावात पोहचले. या प्रवासात ही ट्रॅव्हल्स दोन ठिकाणी थांबली होती. जळगावात आकाशवाणी चौकात उतरून कुलकर्णी दाम्पत्य घरी गेले. त्यानंतर आता घरातील साफसफाई करीत असताना बॅगमध्ये दागिने पाहिले असता त्यात ते दिसून आले नाही. त्यामुळे आशा कुलकर्णी यांनी दि. २४ मार्च रोजी जिल्हा पेठ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ सलीम तडवी करीत आहेत.