मोठी बातमी : जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्यासह अनेक अधिकाऱ्यांना जीवे मारण्याच्या धमक्या !
जळगाव खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – जळगावचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांना जिवे ठार मारण्याची धमकी असणारा मेल पाठविण्यात आला असून सीएमओ कार्यालयाने त्याची दखल घेत तो गृहसचिवांसह जळगाव पोलिसांना पाठविला आहे. याप्रकरणी सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे मार्च महिन्यात अनेक अधिकाऱ्यांनादेखील असे धमकीचे मेल आल्याची माहिती समोर येत आहे.
जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांना जिवे ठार मारण्याची धमकी देण्यात आली. तसा मेल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयीन मेल अकाउंटवर पाठविला आहे. गृह खात्याने त्यावर चौकशी करीत तो जळगाव पोलिस अधीक्षक, अतिरिक्त अधीक्षक, जळगाव जिल्हाधिकारी, उपविभागीय पोलिस अधिकारी, महाराष्ट्र पोलिसांच्या मेलवर पाठविला. मेल आलेल्या ई मेल आयडीचा तांत्रिक तपास सायबर तज्ज्ञांकडून करण्यात येत आहे. मेलमधील भाषा पाहिली तर त्ती स्थानिक असण्याची शक्यता वर्तविली जात आहे. सदर व्यक्ती लवकरच पोलिसांच्या जाळ्यात अडकणार असल्याचीही माहिती सूत्रांनी दिली. गेल्या महिन्यात अज्ञात व्यक्तींच्या माध्यमातून तीन ते चार असे धमकीचे मेल अधिकाऱ्यांना आले अशी माहिती पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी दिली. मेल संदर्भात एवढे गांभीर्याने घेण्यासारखे काही नाही, मात्र दक्षता म्हणून सायबर गुन्हे शाखेत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान ई-मेल आल्याने प्रशासनामध्ये एकच खळबळ उडाली आहे.