Sunday, April 27, 2025
Homeजळगावयावल तालुक्यात राजोरा येथे व्यसनाच्या प्रतिकात्मक होळीचे दहन.

यावल तालुक्यात राजोरा येथे व्यसनाच्या प्रतिकात्मक होळीचे दहन.

यावल तालुक्यात राजोरा येथे व्यसनाच्या प्रतिकात्मक होळीचे दहन.

यावल दि.१०.  खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी
यावल तालुक्यातील राजोरे येथे विद्यार्थ्यांसाठी  युवक,विद्यार्थी, तरुण पिढीजागृतीसाठी व्यसनाच्या प्रतिकात्मक होळी दहनाचा आगळा वेगळा सर्व सामाजिक लक्षवेधी कार्यक्रम संपन्न झाला. होलिका दहन हे समाजातील कुप्रवृत्तींचे दहन असल्याचा सामाजिक संकेत आहे.ह्या संकेताच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना व्यसनाच्या दुष्परिणामांची माहिती व्हावी. आणि होळीसारख्या सणाच्या माध्यमातून कुविचार, कुप्रवृत्ती आणि जीवनावर दुष्परिणाम करणारे अमली पदार्थ यांचे दहन करायचे असा संस्कार विद्यार्थ्यांना मिळण्यासाठी हा कार्यक्रम नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने आयोजित करण्यात आला. या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य चे जळगाव जिल्हा संघटक डॉ दयाघन एस राणे हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून राजोरे गावचे सरपंच सौ. पुष्पताताई पाटील, ग्राम पंचायत सदस्य श्रीमती. सुवर्णा महाजन, तसेच भुसावळ येथील समुपदेशक सौ. आरती चौधरी होत्या.
जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या आवारात जिल्हा परिषद शाळा राजोरे आणि एल एम पाटील विद्यालय राजोरे या माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थी आणि शिक्षक वर्गाने या उपक्रमात सहभाग घेतला.
कार्यक्रम प्रसंगी व्यसनाची आणि अमली पदार्थांची प्रतिकात्मक होळी पेटविण्यात येऊन हा कार्यक्रम उत्साहाने साजरा करण्यात आला.
पारंपरिक होळी मध्ये लाकडे, गोवऱ्या आणि होळीचा दांडा वापरतात. तसे काहीच न वापरता, पर्यावरणाच्या संवर्धनाच्या विचार लक्षात घेऊन शेतीमधील ज्या कचऱ्याचा उपयोग खत बनवणे किंवा जळणे अशा कामांसाठी होत नाही असा निरुपयोगी कचरा, अमली पदार्थांची प्रतिके म्हणून सिगारेट ची कागदी पाकिटे, विडी चे कागद, गुटक्याची कागदी पाकिटे यांच्या माळा तयार करून अमली पदार्थांची प्रतिके म्हणून लावण्यात आल्या. आणि त्यांचे दहन करण्यात आले.
कार्यक्रमात प्रत्यक्ष होलिका दहन करण्या आधी एल. एम. पाटील विद्यालय, राजोरे येथील मुख्याध्यापक श्री. जी. एस. साळुंखे यांनी होळी या सणाचे सांस्कृतिक महत्व सांगून विद्यार्थ्यांना आपल्याला असलेल्या वाईट सवयी आणि मनात येणारे वाईट विचार यांचा प्रयत्नपूर्वक त्याग करायचा असे आवाहन केले. तसेच उपस्थित विद्यार्थ्यांनी आपल्या जीवनात व्यसन करायचे नाही असा संकल्प ही त्यांनी विद्यार्थ्यांना दिला. प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका सौ रंजना सोनवणे यांनी विद्यार्थ्यांना व्यसन केल्यामुळे कर्करोगासारख्या भयानक आजार होतात. त्यामुळे पैसे खुप मोठ्या प्रमाणात तर खर्च होतातच पण माणसे मृत्यमुखीही पडतात. म्हणून आपल्या कुटुंबात, शेजारी कुणी व्यसन करत असेल तर त्यांना विडी, सिगारेट, गुटखा, दारू सारखे अमली पदार्थ घेऊ नका असा आग्रह धरा असे आवाहन केले.
होलिका दहनाच्या प्रत्यक्ष कार्यक्रम प्रसंगी भुसावळ येथील सुप्रसिद्ध समुपदेशक सौ आरती चौधरी, राजोरे येथील सरपंच सौ पुष्पाताई पाटील, मुख्याध्यापिका सौ रंजना सोनवणे व मुख्याध्यापक श्री जी एस साळुंखे यांच्या हस्ते व्यसनांच्या प्रतिकात्मक होळीचे दहन करण्यात आले.
होलिका दहनाच्या कार्यक्रमानंतर आपल्या अध्यक्षीय भाषणात डॉ दयाघन राणे यांनी सांगितले की प्रत्यक्ष अमली पदार्थांची होळी केली तर ते पदार्थ जाळून त्यांचा धूर वातावरणात प्रदूषण तयार करतो. म्हणून अशा पदार्थांची होळी करण्या ऐवजी त्यांची कागदी प्रतिके जाळून ही होळी करण्यात आली. सरपंच सौ पुष्पाताई पाटील यांनी या कार्यक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना होळी सारख्या सणाचे महत्व आणि प्रत्यक्ष विघातक वृत्तीचे दहन कसे केले पाहिजे याची माहिती मिळाली असे व्यक्त केले.
कार्यक्रमाचे आयोजन भुसावळ येथील रोटरी क्लबचे माजी अध्यक्ष रो. सारंग चौधरी, राजोरे येथील सामाजिक कार्यकर्ते मयुर संजय महाजन आणि नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य चे जळगाव जिल्हा संघटक डॉ दयाघन एस राणे यांनी केले.
हा एक आगळा वेगळा कार्यक्रम असून या निमित्ताने आमच्या गावातील विद्यार्थ्यांना होळी या सणाची योग्य प्रकाराने माहिती मिळाली असे मत राजोरे येथील उपस्थित ग्रामस्थांनी व्यक्त केले.
कार्यक्रम प्रसंगी एल. एम. पाटील विद्यालय राजोरे येथील शिक्षक श्री आर. ए. सुरनर, श्रीमती वैशाली इंगळे, सौ मीनाक्षी नारखेडे तर जिल्हा परिषद शाळा राजोरे शिक्षिका वैशाली पाटील, रोटरी क्लब ऑफ भुसावळ चे श्री सारंग चौधरी प्राथमिक आणि माध्यमिक विद्यालयाचे विद्यार्थी आणि ग्रामस्थ उपस्थित होते

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या