रक्षाबंधनाच्या पुर्वसंध्येला एकूलता एक भावासह ३ बहिणींचा पाण्यात बुडून दुदैवी मृत्यू!
जळगाव खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – रक्षाबंधनाचा सण असल्याने सर्वत्र भाऊ बहिणींचा आनंद द्विगुणीत होत असतांना या रक्षाबंधनाच्या पुर्वसंध्येला ५ बहिणींचा एकूलता एक आणि तीन बहिणींचा पाण्यात बुडून दुदैवी अंत झाल्याची घटना चाळीसगाव तालुक्यात डोंगरी नदीजवळील बंधाऱ्यावर हि धक्कादायक घटना रविवारी घडली आहे.
याबाबत सविस्तर वृत्तांत असे की, चाळीसगाव तालुक्यातील पिंपरखेड येथे मध्यप्रदेशमधील सेंधवातील सुभानिया देवचंद पावरा उर्फ सुभाष (आर्य) व स्मिता पावरा हे शेती कामासाठी वास्तव्यास आहे. उदय सुधाकर अहिरे यांच्या शेतात काम करून हे कुटुंब आपला उदरनिर्वाह भागवत आहे. रविवारी पावरा कुटूंबातील मोठी मुलगी संजना पावरा ही जवळच असलेल्या खाटीक बंधारा येथे धुणे धुवायला गेली. तिच्या सोबत तिचे लहान भांवड आर्यन पावरा वय ८, आराध्या उर्फ राणी पावरा वय ६, शिवांजली उर्फ डिंपल पावरा वय ४, रोशनी पावरा वय ३ हे देखील गेले. कपडे धुण्याचे काम आटोपून संजना ही घराकडे परतली मात्र, तिच्या सोबत आलेले चारही भावंड घरी आले नाहीत. त्यामुळे संजना ही पुन्हा बंधाऱ्याकडे आपल्या भावडांना पाहण्यासाठी गेली असता तिला आर्यन हा पाण्याच्या वर तरंगतांना आढळून आला.तिने आराडाओरड केल्याने शेतात काम करत असलेले तिचे वडील सुभाष पावरा यांच्यासोबत शेजारील शेतात काम करत असलेले इमरान पठान, अस्लाम शेख, शाहरूख, मुज्जाइन मेंबर, रवी ठूबे, सिध्दू मोरे यांनी तात्काळ धाव घेतली होती.
दरम्यान, आर्यन पावरा हा पाण्यावर तरंगत असलेला पाहून इमरान पठान यांनी पाण्यात उडी घेत त्याला बाहेर काढले. आर्यनला मृत अवस्थेत पाण्याबाहेर काढल्यानंतर आई वडिलांनी हंबरडा फोडला. मात्र अजून तीन मुली दिसत नसल्याचे उपस्थितांनी पुन्हा पाण्यात उडी घेत पाण्याखाली शोध घेतला असता तिघी मुली पाण्यात आढळून आल्या. त्यांना बाहेर काढल्यानंतर तेथे आलेल्या डॉक्टरांनी तपासून ४ जणांना मृत घोषित केले आहे.