रस्त्यावर एका बांधकाम मजुराला मारहाण करीत रोकड लांबविली ; दोघांविरुद्ध गुन्हा दाखल !
जळगाव खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – शहरातील सुरत रेल्वेगेट भागाजवळील रस्त्यावर एका बांधकाम मजुराला मारहाण करून त्याच्याकडून १७ हजार रुपयांची रोख रक्कम दोन चोरट्यांनी लांबवल्याची घटना मंगळवारी सकाळी १०:३०च्या सुमारास घडली. या प्रकरणी जळगाव शहर पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सविस्तर वृत्तांत असे कि, शहरातील राजमालती नगरातील रहिवासी रवींद्र बाबुलाल लुले (वय ४७) हे बांधकाम मजुरीचे काम करतात. मंगळवारी एका कामाच्या ठिकाणी जात असताना सुरत रेल्वेगेटजवळील रस्त्यालगत दोघांनी त्यांना थांबवत मारहाण करण्यास सुरुवात केली. मारहाण करून त्यांच्या खिशातील १७ हजार रुपयांची रोख रक्कम जबरदस्तीने हिसकावून घेत त्या ठिकाणाहून पळून गेले. या प्रकरणी मंगळवारी सायंकाळी रवींद्र लुले यांच्या फिर्यादीवरून शेख अर्शद शेख हमीद (वय २६, रा. सिटी कॉलनी) व वसीम अली शहाबुद्दीन (वय ३५, रा. फातिमा नगर) या दोघांविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.