रावेर,चोपडा विधानसभा मतदारसंघात आमदारांची दिशाभूल करीत अंगणवाडी सेविका मदतनीस भरती प्रक्रिया संशयास्पद.?
निवड समिती नसताना संपूर्ण अधिकार प्रभारी बाल विकास प्रकल्प अधिकाऱ्याकडे.
यावल दि.२७ खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी रावेर आणि चोपडा विधानसभा मतदार संघाचे आमदार अनुक्रमे अमोलदादा जावळे,प्राध्यापक चंद्रकांत सोनवणे यांची व इतर प्रमुख लोकप्रतिनिधींची,जनतेची दिशाभूल करीत वर्तमानपत्रात जाहिरात न देता अंगणवाडी सेविका आणि मदतनिस यांच्या भरतीची प्रक्रिया संशयास्पद पद्धतीने सुरू असल्याने सर्वसामान्य महिलांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.
विशेष म्हणजे यावल पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी सौ.मंजुश्री गायकवाड,एकात्मिक विकास सेवा योजना यावल येथील प्रभारी बालविकास प्रकल्प अधिकारी म्हणून अर्चना आटोळे या जबाबदार महिला अधिकारी असताना सुद्धा महिला अंगणवाडी सेविका आणि महिला मदतनीस यांची भरती सोईनुसार मनमानी पद्धतीने सुरू असल्याने आणि या भरती प्रक्रियेत निवड समिती सुद्धा नियुक्त नसल्याने संपूर्ण यावल रावेर तालुक्यात आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की यावल पंचायत समिती आवारात एकात्मिक बाल विकास सेवा योजना कार्यालयाचे बालविकास प्रकल्प अधिकारीपद गेल्या ७ ते ८ वर्षापासून महिला अधिकारी अर्चना आटोळे यांच्याकडे आहे.
गेल्या सात आठ वर्षापासून बालविकास प्रकल्प अधिकारी म्हणून एकाच महिला अधिकाऱ्याकडे प्रभारी आणि ते सुद्धा जबाबदारीचे पद असल्याने जिल्ह्यात,तालुक्यात शासकीय स्तरावर अनेकांशी कार्यालयीन शासकीय कामकाजाचे हितसंबंध असल्याने बाल विकास प्रकल्प अधिकाऱ्याने महिला अंगणवाडी सेविकेच्या ३ जागांसाठी,आणि महिला मदतनीस म्हणून ४७ जागांची भरती करण्यासाठी कोणत्याही वृत्तपत्रात जाहिरात न देता फक्त ग्रामपंचायतीच्या नोटीस बोर्डावर सूचना देऊन भरती प्रक्रिया सुरू केली.
अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्या भरती प्रक्रियेबाबत अटी शर्तीचे फॉर्म बघितला असता फॉर्म मिळण्याचे ठिकाण पत्ता झेरॉक्स दुकानदारांचा दिलेला आहे.
अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्याकडून फॉर्म स्विकारण्याची प्रक्रिया पोस्टाने न राबविता प्रत्यक्ष यावल येथील बाल विकास प्रकल्प कार्यालयात जमा करण्याची टीप नोंद केली आहे.
अंगणवाडी सेविका पदासाठी आणि मदतनीस पदासाठी किती महिलांनी फॉर्म भरून कार्यालयात जमा केले याची संख्या सुद्धा कार्यालयातून समजली नाही.
मंगळवार दि.२५ फेब्रुवारी आणि गुरुवार दि.२७ फेब्रुवारी २०२५ रोजी यावल पंचायत समितीत एकात्मिक बाल विकास सेवा योजना कार्यालयात प्रत्यक्ष माहिती घेण्यासाठी गेलो असता त्या ठिकाणी बाल विकास प्रकल्प अधिकारी उपस्थित नसल्याची माहिती कार्यालयातील कनिष्ठ सहाय्यक संदीप तायडे यांनी दिली तसेच बाल विकास प्रकल्प अधिकारी यांच्याकडे चोपडा पंचायत समिती कार्यालयातील अतिरिक्त कार्यभार असल्याने त्या आज यावल येथील कार्यालयात उपस्थित नाही अशी माहिती मिळाली.
बाल विकास प्रकल्प अधिकारी गेल्यास ७ ते ८ वर्षापासून एकाच ठिकाणी पदभार सांभाळत असून सुद्धा त्यांच्या कार्यालयात त्यांनी कोणत्या दिवशी कोणत्या कार्यालयात कोणत्या वेळेला उपस्थित राहणार आहेत किंवा नाही किंवा कोणत्या ठिकाणी कार्यालयीन कामकाजासाठी मिटींगला गेलेले आहेत याबाबतचा फलक लावलेला नाही. यामुळे अंगणवाडी सेविका आणि मदतनीस भरती प्रक्रिया आणि कार्यालयाचा सोयीनुसार सुरू कामकाजामुळे रावेर व चोपडा मतदारसंघाचे आमदार आणि त्यांचे लोकप्रतिनिधी दिशाभूल होत असल्याची चर्चा सुद्धा यावल,रावेर चोपडा तालुक्यातून होत आहे.
अंगणवाडी सेविका मदतनीस भरती प्रक्रियेचे अधिकार प्रभारी अधिकाऱ्याकडे निवड समिती गेली खड्ड्यात.
यावल पंचायत समिती कार्यालयातील बाल विकास प्रकल्प अधिकारी यांच्यातर्फे अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांची भरती प्रक्रिया सुरू असून याबाबत जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी,उपमुख्य कार्यकारी अधिकारी, यावल पंचायत समिती गट विकास अधिकारी यांनी भरती प्रक्रिये बाबत निवड समितीची नियुक्ती का केली नाही असा प्रश्न सुद्धा उपस्थित केला जात आहे.