राहुरी कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांतकुमार पाटील यांचे निधन!
राहुरी – महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांतकुमार पाटील यांचे अल्पशा आजाराने बुधवारी (दि.२९) रोजी पहाटे निधन झाले. कुलगुरूंच्या पश्चात त्यांची पत्नी व दोन मुले आहेत. त्यांच्या निधनामुळे कृषी विद्यापीठामध्ये शोकाकुल वातावरण झाले आहे.
महात्मा फुले कृषी विद्यापीठाचा कुलगुरु पदाचा पदभार सांभाळण्यापूर्वी त्यांनी मुंबई येथील केंद्रीय कापूस तंत्रज्ञान संशोधन संस्थेच्या (सिर्कोट) संचालक पदाची व तंत्रज्ञान हस्तांकरण प्रमुख ही महत्वाची पदे भूषवली आहेत. काही काळ त्यांनी यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ, नाशिक येथील प्रभारी कुलगुरू या पदाचा देखील कारभार सांभाळला होता. कृषी क्षेत्रातील संशोधन व विस्तार उपक्रमातील सेवेचा त्यांना ३३ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव होता. ४ पुस्तके, १९९ संशोधनात्मक पेपर, तांत्रिक शिक्षणासंबंधीची १४ पुस्तके व १ पेटंन्ट त्यांच्या नावावर जमा आहे. राहुरी कृषी विद्यापीठांमध्ये कुलगुरु पदाची धुरा सांभाळल्यानंतर त्यांनी सुयोग्य निर्णय घेऊन विद्यापीठाला शिक्षण, संशोधन व विस्तारत विद्यापीठाला नावलौकिक मिळवून दिले. त्यांच्या कुशल नेतृत्वामुळे विद्यापीठाला नुकतेच उत्कृष्ट ‘ए’ ग्रेड मानांकन प्राप्त झाले आहे. कर्मचारी, अधिकारी व शेतकऱ्यांच्या हिताचे बरेच निर्णय त्यांनी घेतले.
यामध्ये विद्यापीठातील कर्मचाऱ्यांकरिता कारकीर्द प्रगती योजना, १२/२४ आश्वासित प्रगती योजना, कर्मचाऱ्यांच्या सोयीस्कर पदस्थापना, अनुकंप भरती, सेवानिवृत्त लाभ आणि सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना सुधारित निवृत्तीवेतन, विद्यापीठ प्रकल्पग्रस्तांची जाहिरात. तसेच, त्यांच्या नेतृत्वाखाली विद्यापीठामध्ये नाविन्यपूर्ण संशोधन प्रकल्प सुरू करण्यात आले. कार्यतत्परशैली, पारदर्शकता तसेच योग्य निर्णयासाठी ते प्रसिद्ध होते. त्यांच्या या अचानक निधनामुळे विद्यापीठामध्ये शोकाकुल वातावरण झाले आहे. त्यांना विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू डॉ. साताप्पा खरबडे, संचालक संशोधन डॉ. विठ्ठल शिर्के, संचालक विस्तार शिक्षण डॉ. गोरक्ष ससाणे, कुलसचिव डॉ. नितीन दानवले, नियंत्रक सदाशिव पाटील, विद्यापीठ अभियंता मिलिंद डोखे यांनी तसेच विद्यापीठाच्या सर्व कर्मचाऱ्यांनी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली आहे.