वरणगांवसह परिसरामधे वृक्षांची सर्रास होतेय कत्तल वनविभागाचा कानाडोळा .
वरणगांव : वरणगांव व परिसरामधे हिरव्यागार निंबाच्या वृक्षांची अवैधपणे सर्रास कत्तल होत असुन दररोज ट्रॅक्टरद्वारे त्या लाकडांची मोठमोठया ताडपत्र्यांनी झाकून सॉमील पर्यंत वाहतुक होत असुन त्याकडे वनविभागासह संबंधितांचा पद्धतशीरपणे कानाडोळा झालेला दिसुन येत आहे त्यामुळे कुठेतरी पाणी मुरतेय असा सुर सुज्ञ नागरिकांमधे उमटत असुन चर्चेला उधाण आले आहे .
असाच प्रकार येथे दि .१९ सप्टेंबर रोजी घडला असुन वरणगावातुन भुसावळ कडे जाणाऱ्या छत्रपती शिवाजी नगरसमोरील जून्या महामार्गाच्या कडेला सार्वजनिक बांधकाम विभागाअंतर्गत उभ्या असलेल्या हिरवीगार व डेरेदार जिवंत निंबाच्या दोन वृक्षांची दि .१९ सप्टेंबर रोजी भरदिवसा निर्दयीपणे कत्तल करण्यात आली आहे. याकडे मात्र वनविभागासह पीडब्ल्यूडी खात्याने कानावर हात ठेवले आहे .
सदर डेरेदार वृक्षांची कत्तल करणाऱ्यास स्थानिकांनी विचारले असता त्यानी शेजारी असलेल्या ठाकुर गॅरेजचे मालकाने सांगितल्यावरुन झाडाच्या मोठमोठ्या फांद्या कापल्याचे सागीतले . तर ठाकूर यांनी माझा काही संबंध नसल्याचे म्हटले आहे. झाडाच्या मोठमोळ्या फांद्या कटर मशीनने कापत असतांना घटनास्थळी नागरीकांची मोठी गर्दी जमली होती. यावेळी नगरपरिषदेचे कार्यालयीन अधिक्षक पंकज सुर्यवंशी व कर्मचारी घटनास्थळी आले व संबंधितांना जाब विचारुन सदर व्यक्तीकडुन वृक्ष कटर मशीन ताब्यात घेऊन तेथील वृक्षांची लाकडे ट्रॅक्टरद्वारे नगरपरिषद मधे जमा करण्यात आले आहे मात्र
नगरपरिषदेचे मुख्याधिकारी काय कार्यवाही करणार या कडे वृक्षप्रेमींचे लक्ष लागले आहे.यावेळी वन विभागाला सुद्धा सुज्ञ नागरिकांनी फोन केले होते ‘ त्यानुसार वन कर्मचारी यांनी हा विषय आमच्या अखत्यारितला नसुन पीडब्ल्युडी च्या वृक्षाची कत्तल झाल्यामुळे त्यांनी कार्यवाही करावी अशी अपेक्षा व्यक्त केली .व पीडब्ल्युडी च्या अधिकाऱ्यांना फोन लावले असता त्यांनी सुद्धा टोलवाटोलीची उत्तरे दिली . त्यामुळे जनसामान्यासमोर हात वर करणाऱ्या दोन्ही खात्याचा चेहरा समोर आला आहे . मग कारवाई नेमकी कोण करेल असा प्रश्न सुज्ञ नागरिकांना पडला आहे .