वरणगावातील तळवेल येथे शेताच्या गव्हात आढळला अनोळखी इसमाचा मृतदेह !
वरणगाव खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – तळवेल शिवारात रविवारी सकाळी एका शेताच्या गव्हात एका अनोळखी इसमाचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला. त्या इसमाचा मृत्यु आठ दिवसापूर्वी झाला असल्याने मोकाट कुत्र्यांनी मयताच्या शरीराराचा एक हात व एका पायाचे लचके तोडल्याचे आढळून आले. सुरुवातीला खुनाची अफवा पसरली होती. तर या घटनेचा पोलीसांनी – पंचनामा करून मृतदेहाचा दफनविधी करण्यात आला.
याबाबत सविस्तर वृत्तांत असे की, तळवेल बोहर्डी मार्गावरील पन्नाशी शिवारातील – तळवेल ग्रामपंचायत मालकीच्या मक्त्याने केलेल्या गट क्रं २६५ व २५९ मध्ये जितेंद्र विजय पाटील यांनी गहु लागवड केली आहे. यामुळे आठ दिवसानंतर रविवारी सकाळी ९ वाजेच्या सुमारास ते आपल्या गहु पिकाला पाणी देण्यासाठी गेले असता त्यांना गव्हाच्या पिकात एक ३० ते ३५ वयोगटातील अज्ञात युवकाचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला. यावेळी मृतदेहाचा एक हात व एक पाय मोकाट कुत्र्यांनी तोडल्याचे निर्दशनास आले. यामुळे त्यांनी पोलीस पाटील दिव्या पाटील व सरपंच विद्या भारसके यांचे पती उल्हास भारसके यांना माहिती देताच त्यांनी घटनास्थळी जावून पाहणी केली. त्यानंतर वरणगाव पोलीस ठाण्यात खबर दिली.
वरणगाव पोलीस ठाण्याचे पोहेकॉ प्रेमचंद सपकाळे, पो.कॉ. मनोज म्हस्के व होमगार्ड राजेंद्र फालक यांनी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली घटनास्थळी धाव घेऊन मृतदेहाचा पंचनामा केला. वरणगाव ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. योगेश अहीरे यांनी घटनास्थळीच मृतदेहाचे शवविच्छेदन केले. यानंतर ग्रामपंचायतीच्या माध्यमातून मृतदेहाचे दफनविधी करण्यात आले.