वाहत्या पाण्यात अतिधाडस नको ; खबरदारी बाळगा प्रशासनाचे आवाहन !
भुसावळ खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – गणपतीबाप्पाचे विसर्जन आपण पाण्यात करत असतो व दरवर्षी अनेक ठिकाणी विसर्जना प्रसंगी दुर्देवाने भक्तांचा पाण्यात बुडून दुःखद घटना घडतात. त्या होऊ नये म्हणून गणेशभक्तांनी स्वतःची काळजी घेणे आवश्यक असल्याचे प्रशासकडून आवहन करण्यात आले आहे.
प्रत्येक वर्षी मोठ्या उत्साहाने भक्तिभावाने गणेशोत्सव साजरा होतो. यंदाही मोठ्या उत्साहात गणेशोत्सव साजरा होत आहे. गणेश मंडळांनी. जुन्या रीती,रीवाज पद्धती सोडून नवनवीन उपक्रमांची कास धरली आहे. त्यात विविध सांस्कृतिक कार्यक्रमांसह क्रीडा स्पर्धा व जनजागरण कार्यक्रमांवर भर दिला आहे. यंदा निसर्ग देवतेने सुद्धा भरभरून प्रतिसाद दिला असून सर्वत्र समाधानकारक पाऊस झाल्याने सर्वच ठिकाणचे जलस्रोत तुडुंब भरले आहेत. दरम्यान, सर्व गणेशोत्सव मंडळांनी गणेशमूर्ती स्थापनेपासून विविध उपक्रमांसह बाप्पाच्या विसर्जनाची मिरवणूक व कुठे विसर्जन करायचे याचे संपूर्ण नियोजन केले आहे. काही ठिकाणी बाप्पाचे विसर्जन दीड दिवसात, तर काही ठिकाणी पाच दिवसांत झाले. आता अनंत चतुर्दशीच्या दिवशी प्रशासनाच्या वतीने विसर्जनाची जय्यत तयारी सुरू आहे.मंगळवारी (ता. १७) भुसावळ, वरणगावसह गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्यांसह सर्वच गणेशभक्त जल्लोषात बाप्पाचे विसर्जन करणार आहेत. यात वाद्याच्या तालावर नृत्याचा मनमुराद आनंद लुटत मिरवणूक विसर्जन स्थळापर्यत पोचणार आहे. गणेशभक्तांच्या सुरक्षेकरीता पोलिस प्रशासनाने कंबर कसली आहे. तर बाप्पाच्या विसर्जन गुण्यागोविंदाने व्हावे या दृष्टीने पालिका प्रशासनाकडून रस्त्यांची डागडूज्जी केली जात आहे. उंच मुर्ती असल्याने विसर्जन मार्गातील वृक्षांच्या फांद्याची महाविजवितरण विभागाकडून छाटणी केली जात आहे. तर तापी नदी काठावर नगरपालिकेच्या माध्यमातून गणेशभक्तांच्या सुरक्षेच्या दुष्टीने जगरेटरसह विजप्रवाहाची व्यवस्था, हॅलोजन, स्ट्रीट लाईट असे विविध गणपती भक्तांच्या सुविधाकारीता कार्य सुरू असून हतनूर धरणांवर सुद्धा मोठ्या प्रमाणात विसर्जन होणार आहे. त्या दृष्टीने प्रशासनाने नदीपात्रात पट्टीच्या पोहणाऱ्यांमध्ये अध्यक्ष राजेंद्र सोमा वाघ, रविद जालम धुळेकर, विजय नामदेव धुळेकर,मनोज सखाराम ठाकरे, युवराज रघुनाथ तोरे,नितेश जयराम नवर, गजानन नवलसिग पवार, गणेश समाधान सोनवणे ,सुभाष मुळा ठाकरे,चन्दू दिलिप धुळेकर, शरद अबर पवार आदी यांनी सहभाग घेतला आहे.
यावेळी बाप्पाची मनोभावे पूजा-आरती झाल्यावर विसर्जन करण्यासाठी घाई केली जाते व अशावेळी अति उत्साहाच्या भरात आड, विहीर, बारव, डोह, खदान, बंधारा, नदी, तलाव, सरोवर, तळे किंवा आता पावसामुळे मोठ्या प्रमाणात साचलेल्या पाण्यामध्ये गणरायाचे विसर्जन करताना विशेष काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.