व्याजाने घेतलेल्या पैशाचा वाद : चौघांनी केली एकला मारहाण !
जळगाव खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – व्याजाने घेतलेले १ लाख ७५ हजार रुपये द्यावे म्हणून गोलू शिंपी, सागर सोनवणे, नितीन बोरसे व मयुर (पूर्ण नाव नाही) अशा चौघांनी शेख शकील शेख गुलाब (वय ४३, रा. मास्टर कॉलनी, जळगाव) या रिक्षा चालकाला मारहाण केल्याची घटना दि. ३ एप्रिल रोजी सायंकाळी जोशी पेठेत घडली. याप्रकरणी चौघांविरुध्द शनी पेठ पोलिसात गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत सविस्तर वृत्तांत असे कि, शहरातील मास्टर कॉलनीतील गणेशपुरी भागात शेख शाकील शेख गुलाब हे रिक्षा चालक वास्व्यास आहे. दि. ३ रोजी सायंकाळी जोशी पेठेतील लाकडाच्या वखारीजवळ आले असता, त्यांना गोलू शिंपी, सागर सोनवणे, नितीन बोरसे व मयुर (पूर्ण नाव नाही) अशा चौघांनी त्यांना व्याजाने दिलेले १ लाख ७५ हजार रुपयांची मागणी केली. त्यावर शेख शाकील यांनी मी तुमचे सर्व पैसे परत दिले आहे, येवढे पैसे माझ्याकडे नाहीत, पैसे आल्यावर थोडे थोडे देईल असे म्हणताच चौघांनी त्यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. यावेळी मयूर नामक इसमाने त्याच्या हातातील फायटरने शेख शाकील यांच्या तोंडावर मारुन त्यांना गंभीर जखमी केले. दरम्यान, शेख शाकील यांनी लागलीच शनिपेठ पोलिसात तक्रार दिली. त्यानुसार चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सफौ परिष जाधव करीत आहे.