Sunday, March 16, 2025
Homeगुन्हाव्यापारी वर्गात खळबळ : चॉपर गळ्यास लावून ३ लाखांची बॅग लांबवली

व्यापारी वर्गात खळबळ : चॉपर गळ्यास लावून ३ लाखांची बॅग लांबवली

व्यापारी वर्गात खळबळ : चॉपर गळ्यास लावून ३ लाखांची बॅग लांबवली

चाळीसगाव खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – चॉपर गळ्यास लावून ३ लाखांची रोकड असलेली बॅग हिसकावून जबरी चोरी केली. तसेच विक्रेता विशाल अशोक कारडा यांना दमदाटी, शिवीगाळ व धक्काबुक्की करत त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली.

याबाबत सविस्तर वृत्तांत असे की, सदर घटना चाळीसगाव एमआयडीसीमधील गोडावूनमध्ये ७ रोजी, रात्री ११ : ३० वाजता घडली. याप्रकरणी शनिवारी सायंकाळी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. चौघेजण फरार असून, त्यांचा शोध पोलीस घेत आहे.चाळीसगाव एमआयडीसीमध्ये विशाल कारडा यांचे व्यवसायासाठी गोडावून आहे. या गोडावूनमध्ये कारडा असताना शुक्रवारी रात्री अकरा वाजता चारजण तेथे आले आणि त्यांच्याकडे पैशांची मागणी करू लागले. प्रथम त्यांना शिवीगाळ व दमदाटी करण्यात आली. पैसे देण्यास विरोध केला म्हणून त्यांना धक्काबुक्की करत त्यांच्या गळ्यास चॉपर लावून मारण्याची धमकी दिली. या घटनेची फिर्याद विशाल कारडा यांनी पोलिसात दिल्यावरून निखिल उर्फ भोला सुनील अजबे, गौरव रवींद्र पाटील, ऋषिकेश उर्फ मायकल दीपक पाटील व एक साथीदार (सर्व रा. चाळीसगाव) या चौघांच्या विरोधात भारतीय न्याय संहिता कलम ३०९ (४) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गोडावूनमधील दोघे कारडा यांच्या मदतीसाठी आले असता, त्यांनाही दमदाटी, शिवीगाळ करून मारण्याची धमकी दिली. त्यामुळे दोघेजण बाजूला सरकले. नंतर विशाल कारडा यांच्या जवळील बॅग जबरदस्तीने त्यांनी हिसकावली.  पोलिसात तक्रार केली तर तुला जिवंत ठेवणार नाही अशी धमकी देत चौघे तेथून पसार झाले. या बॅगेत ३ लाखाची रोकड, आधार कार्ड, पॅनकार्ड, डेबिट कार्ड व इतर कागदपत्रे होती.

या घटनेमुळे चाळीसगावातील व्यापारी वर्गात खळबळ उडाली आहे. गेल्या काही दिवसांपासून गुन्ह्यांमध्ये वाढ झाली आहे. त्यात आताच्या घटनेमुळे पुन्हा दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या