शहरात अवैध गौमांस कत्तलीवर पोलिसांची मोठी कारवाई ; गौमांस कत्तल-विक्री करणाऱ्या तिघाना अटक !
जळगाव खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – शहरात अवैध गौमांस व्यापार आणि कत्तलीवर पोलिसांनी मोठी कारवाई करत तीन आरोपींना अटक केली आहे. मास्टर कॉलनी परिसरात रविवारी ९ फेब्रुवारी रोजी दुपारी ३ वाजता ही धडक कारवाई करण्यात आली असून, पोलिसांनी तब्बल १५० किलो गौमांस जप्त केले आहे.
याबाबत सविस्तर वृत्तांत असे की,पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे गुन्हे शोध पथकाने मास्टर कॉलनी भागात छापा टाकला. उमर मस्जिदजवळील एका घरात तसेच एका रिक्षामध्ये अवैधरीत्या गौमांस विक्री केली जात असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत धनके, पोलीस नाईक किशोर पाटील, पोशि गणेश ठाकरे, छगन तायडे, किरण पाटील आणि योगेश घुगे यांच्या पथकाने तातडीने कारवाई केली.छाप्यादरम्यान आरोपी युसूफ खान समशेर खान (वय ५०, रिक्षाचालक, रा. तांबापुरा, जळगाव) हा त्याच्या रिक्षामध्ये १०० किलो गौमांस घेऊन जात असताना आढळून आला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले असता, त्याने गौमांस शेख शकील शेख चाँद (वय ३८, राहणार मास्टर कॉलनी, जळगाव) याच्याकडून खरेदी केल्याची कबुली दिली.
यानंतर पोलिसांनी शेख शकील शेख चाँदच्या घराची झडती घेतली असता, त्याचा साथीदार आसीफ खान लतीफ खान (वय ३०, इस्लामपुरा, शनिपेठ, जळगाव) याच्या मदतीने तो घरातच गोवंश कत्तल करत असल्याचे आढळले. पोलिसांनी त्याच्या घरातून ५० किलो गौमांस, तसेच कत्तलीसाठी वापरण्यात येणाऱ्या कुऱ्हाड, सुरा यांसारख्या धारदार हत्यारांसह दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले.