शहर पोलिसांचा छापा : ५ लाखांचे एमडी ड्रग्ज जप्त !
जळगाव खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – शहरात मोठ्या प्रमाणात आमली पदार्थाची सर्रासपणे विक्री होत असल्याच्या अनेक तक्रारी होत आहे. अशीच तक्रार प्राप्त झाल्यानंतर एमडी ड्रग्ज विक्रीचे केंद्र समजले जाणाऱ्या शाहूनगरात शहर पोलिसांच्या पथकाने शनिवारी रात्री छापा टाकून कारवाई केली. या कारवाईत सर्फराज जावेद भिस्ती (वय २३, रा. पडक्या शाळेजवळ, शाहूनगर) याच्याकडून ५ लाख ३४ हजार रुपये किंमतीचे ५३ ग्रॅम वजनाचे मॅफेड्रॉन एमडी ड्रग्ज जप्त केले. याप्रकरणी त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे.
याबाबत सविस्तर वृत्तांत असे की, शहरातील शाहूनगरातील पडकी शाळेजवळ एमडी ड्रग्ज विक्री होत असल्याचा तक्रार अर्ज परिसरातील नागरिकांनी शहर पोलिस ठाण्यात केला होता. त्या अर्जाची चौकशी केल्यानंतर संशयित सर्फराज भिस्ती हा संशयित हे एमडी ड्रग्ज विक्री करीत असल्याची माहिती शहर पोलिसांना मिळाली. उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावित यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अनिल भवारी, सहाय्यक पोलीस निरीक्षक शितलकुमार नाईक यांच्यासह गुन्हे शोध पथकातील सपोउनि सुनिल पाटील, पोहेकों विजय निकुंभ, सतिष पाटील, प्रफुल्ल धांडे, योगेश पाटील, चंद्रकांत सोनवणे, उद्धव सोनवणे, प्रणय पवार, अमोल ठाकूर यांचे पथक तयार केले. शहर पोलिसांच्या पथकासोबत फॉरेन्सिक तज्ञांचे पथक हे घटनास्थळी दाखल झाले. या पथकाने मध्यरात्रीच्या सुमारास शाहू नगरातील पडक्या शाळेजवळ राहणाऱ्या सर्फराज भिस्ती याच्या घरावर छापा टाकला. सुरुवातीला पथकाने त्याची चौकशी करुन घराची झडती घेण्याबाबत विचारणा केली असता, त्याने घर झडती घेण्यास विरोध करुन उडवाउडवीची उत्तरे देवू लागला. शाहू नगर र हे है एमडी ड्रग्ज विक्रेत्यांचे केंद्र बनलेले असून त्याठिकाणी त्यांचा मोठ्या प्रमाणात वावर असतो.
याठिकाणी रात्रीच्या सुमारास अलिशान गाड्यांमध्ये काही तरुण एमडी घेण्यासाठी येत असतात. गेल्या वर्षभरापुर्वी शहर पोलिसांनी शाहू नगरात तब्बल दहा लाख रुपयांचे एमडी ड्रग्ज पडकले होते. त्यानंतर आता पुन्हा सव्वा पाच लाख रुपयांचे ड्रग्ज पकडल्यामुळे परिसरात खळबळ माजून गेली आहे.पोलिसांनी सर्फराज भिस्ती याची चौकशी करण्यास सुरुवात केल्यानंतर त्याने घराच्या प्रवेशदाराजवळ असलेल्या बाथरुमच्या वर लोखंडी पत्र्याच्या सपाटीत एका लेडीज पाकीटात एमडी ड्रग्ज ठेवल्याचे सांगितले. पथकाने ते पाकीट ताब्यात घेत पाहणी केली असता, त्यामध्ये ५३ ग्रॅम वजन असलेले उर्ग दर्प येत असलेले ड्रग्ज मिळून आले.