शांतता समिती सदस्यांनी गणेशोत्सवाची,शासनाची काळजी घेतली : डीवायएसपी अन्नपूर्णा सिंग.
यावल दि २७ खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी
यावल शहरात जातीय सलोखा कायम ठेवून गणेशोत्सव शांततेत साजरा करताना शांतता समितीच्या सर्व सदस्यांनी गणेशोत्सव,गणेश विसर्जनाची आणि शासनाची विशेष काळजी घेऊन गणेशोत्सव साजरा केल्याने आणि दुर्गोत्सव सुद्धा याच पद्धतीने साजरा करणार असल्याने आणि दुर्गोत्सव साजरा करताना आणि विसर्जन मिरवणुकीसाठी येणाऱ्या समस्या अडीअडचणी वीज वितरण कंपनी आणि नगरपरिषद यांच्यामार्फत सोडवण्यासाठी प्रयत्न केले जातील असे डीवायएसपी अन्नपूर्णा सिंग यांनी शांतता समिती बैठकीत सांगितले.
आज शुक्रवार दि.२७ रोजी सकाळी ११ वाजता यावल पंचायत समिती सभागृहात शांतता समिती सदस्यांची बैठक घेण्यात आली, बैठकीत दुर्गोत्सव मंडळाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष,पदाधिकारी तसेच शांतता समिती सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते या बैठकीत दुर्गोत्सव मंडळाच्या अध्यक्षांनी सांगितले की दुर्गोत्सव मंडळाची संख्या लक्षात घेता विसर्जन करताना वेळ वाढवून मिळायला पाहिजे,तसेच रस्त्यावरील खड्डे,काही ठिकाणी रस्त्यावर झालेल्या अतिक्रमणामुळे मिरवणुकीस अडथळा निर्माण होतो इत्यादी समस्या सांगण्यात आल्या.
गणेशोत्सव,दुर्गोत्सव विसर्जन समारोप करताना यावल नगर परिषदेने मंडळाचे स्वागत सत्काराचा कार्यक्रम आयोजित करायला पाहिजे असा प्रश्न शांतता समिती सदस्य पुंडलिक बारी यांनी उपस्थित केल्याने नगरपालिका कर्मचारी बबलू घारु आणि त्यांच्यात शाब्दिक चकमक उडाली. सामोपचाराने याबाबत निर्णय घेतला जाईल असे निष्पन्न झाले.
दुर्गोत्सव साजरा करताना या मंडळाच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या अडीअडचणी आहेत त्यांनी प्रत्यक्ष भेटून चर्चा करावी त्यातून समस्या सोडविण्याचे काम केले जाईल असे आश्वासन पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांनी दुर्गोत्सव मंडळाच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांना दिले.
शांतता समिती बैठकीत जेष्ठ सदस्य हाजी शब्बीर खान,विजय सराफ, पोलीस पाटील यांच्यासह हिंदू मुस्लिम बांधवांसह सर्व स्तरातील शांतता समिती सदस्य दुर्गोसोव मंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बैठकीत निवासी नायब तहसीलदार संतोष विनंते,वीज वितरण कंपनीचे अधिकारी नगरपालिका कर्मचारी उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांनी करून दुर्गोत्सव मंडळांना महत्त्वाच्या सूचना दिल्या.
तहान लागल्यावर विहीर खोदण्याचा प्रयत्न – शांतता समितीच्या बैठकीत सर्वपक्षीय स्थानिक पदाधिकारी,कार्यकर्ते, समाजसेवकांच्या उपस्थितीत नेहमी हिंदू मुस्लिम व सर्वस्तरीय सण उत्सव साजरा करताना यावल शहरातील अतिक्रमण,रस्त्यावरील खड्डे, इत्यादी समस्यांचा पाढा वाचला जातो.परंतु हेच प्रश्न काही संबंधितांनी आपल्या वरिष्ठ नेते मंडळी यांच्या माध्यमातून नगरपालिका,वीज वितरण कंपनी यांच्याशी समन्वय साधून वेळीच समस्या सोडविल्या पाहिजे किंवा त्याबाबत तशी कायमस्वरूपी कार्यवाही करायला पाहिजे,कारण रस्ते वरील खड्डे अतिक्रमण या समस्या तात्काळ सोडविल्या जात नाहीत आणि ते पोलिसांचे काम नाही, हे लक्षात घेता आणि अतिक्रमण आणि रस्त्यावरील खड्डे याबाबत संबंधित यंत्रणा मात्र गप्प बसून सोयीनुसार कामे करीत असल्याने उत्सव साजरे करताना पोलिसांना जबाबदार धरले जात असल्याने तहान लागल्यावर विहीर खोदण्याचा प्रयत्न आणि देखावा केला जात असल्याचे यावल शहरात बोलले जात आहे.