Thursday, March 27, 2025
Homeजळगावशिक्षणाचा दहा कलमी कार्यक्रम प्रभावीपणे राबविण्यासाठी इगतपुरीला कार्यशाळा

शिक्षणाचा दहा कलमी कार्यक्रम प्रभावीपणे राबविण्यासाठी इगतपुरीला कार्यशाळा

शिक्षणाचा दहा कलमी कार्यक्रम प्रभावीपणे राबविण्यासाठी इगतपुरीला कार्यशाळा

जळगाव -खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी  राज्यभरातील शैक्षणिक गुणवत्ता वाढावी यासाठी शिक्षणाचा दहा कलमी कार्यक्रम ठरवण्यात आला आहे. हा कार्यक्रम प्रभावीपणे राबविण्यासाठी शालेय शिक्षण मंत्री, शिक्षण विभागातील अधिकारी आणि राज्यभरातील उपक्रमशील शिक्षक यांची एकदिवसीय राज्यस्तरीय शैक्षणिक गुणवत्ता विकास कार्यशाळा नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी येथे आयोजित करण्यात आली आहे. या कार्यशाळेत राज्यभरात राबवल्या जाणाऱ्या शैक्षणिक गुणवत्ता विकसनाबाबत चर्चा करण्यात येणार आहे.

नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी विविध कार्यक्रमांचे नियोजन करून उपक्रमांची आखणी केली जात आहे. राज्यातील शाळांमधील गुणवत्तेत सातत्याने वाढ होत राहावी, यासाठी सातत्यपूर्ण शैक्षणिक गुणवत्ता विकास होणे गरजेचे आहे. या दृष्टिकोनातून शालेय शिक्षणमंत्री ना. दादा भुसे यांनी शिक्षणाचा दहा कलमी कार्यक्रम प्रभावीपणे राबविण्याच्या सूचना शिक्षण विभागाला दिल्या आहेत. त्यानुसार निवडक तज्ज्ञांची एकदिवसीय राज्यस्तरीय शैक्षणिक गुणवत्ता विकास कार्यशाळा नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी येथील मानस लाइफस्टाईल रिसॉर्ट येथे दि. 8 फेब्रुवारी 2025 रोजी आयोजित करण्यात आली आहे.

जळगाव जिल्ह्यातून डॉ. जगदीश पाटील यांची निवड

राज्यस्तरीय शैक्षणिक गुणवत्ता विकास कार्यशाळेत राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातून एक उपक्रमशील शिक्षक सहभागी होणार आहे. त्यात जळगाव जिल्ह्यातून कंडारी येथील जिल्हा परिषद मराठी शाळेतील पदवीधर शिक्षक तथा बालभारती मराठी भाषा अभ्यास मंडळाचे सदस्य डॉ. जगदीश लक्ष्मण पाटील यांची निवड करण्यात आली आहे. अभ्यासक्रम, अध्ययन-अध्यापनशास्त्र आणि मूल्यमापन तसेच प्रशिक्षण कार्यक्रम विकसनाच्या विविध राज्यस्तरीय कार्यक्रमांमध्ये त्यांचा सातत्याने सहभाग असतो.

शिक्षणाचा दहा कलमी कार्यक्रम –

राज्यगीत व मराठी भाषा प्रभावीपणे अंमलबजावणी, विद्यार्थी केंद्रित गुणवत्तापूर्ण व आनंददायी शिक्षण, शाळा भेटींचा कृती कार्यक्रम, सर्व शाळांचा विविध योजनांद्वारे भौतिक विकास, आनंद गुरूकुल निवासी शाळा स्थापन करणे, शिक्षक भरती प्रक्रिया जलद गतीने राबवणे, शिक्षक व इतर अधिकारी, कर्मचारी यांचे शिक्षणबाह्य काम कामे कमी करणे, राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी करणे, नाविन्यपूर्ण व गुणात्मक कार्य करणाऱ्या शिक्षक, सेवाभावी संस्था, शाळा व्यवस्थापन समिती, शैक्षणिक संस्था व अधिकारी यांचा गौरव करणे आणि विद्यार्थी आरोग्य व पोषण कार्यक्रम सक्षमपणे राबवणे असा शिक्षणाचा दहा कलमी कार्यक्रम ठरविण्यात आला आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या