शिवछत्रपती रंगभरण स्पर्धेत घडले विद्यार्थ्यांच्या कलेचे दर्शन
भुसावळ – हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून जळगाव तालुक्यातील कंडारी येथील जिल्हा परिषद मराठी शाळेत आयोजित शिवछत्रपती रंगभरण स्पर्धेत विद्यार्थ्यांनी शिवरायांच्या पूर्णाकृती चित्रात विविधांगी रंग भरून आपल्या कलेचे दर्शन घडवले.
शाळेतील पदवीधर शिक्षक डॉ. जगदीश पाटील यांच्या संकल्पनेतूुन शिवछत्रपती रंगभरण स्पर्धा घेण्यात आली. छत्रपती शिवरायांचे पूर्णाकृती चित्र हे मोठ्या ड्रॉईंग शिटवर विद्यार्थ्यांना देवून आपल्या कलाकौशल्यांचा वापर करून चित्र रंगविण्याचे सांगण्यात आले. त्यासाठी शाळेच्या आवारात विद्यार्थ्यांना मोकळेपणाने बसविण्यात आले. त्यात पहिली ते आठवीच्या सुमारे दिडशे विद्यार्थ्यांनी सहभाग घेवून छत्रपती शिवरायांच्या चित्रात कोरडे व ओले रंग भरून चित्र आकर्षकरित्या रंगवले. त्यानंतर या सर्व चित्रांचे परीक्षण करण्यात येवून विजेते जाहिर करण्यात आले. त्यात पहिलीतून चंदन वानखेडे, दुसरीतून चेतन कोळी, तिसरीतूून दुर्गेश्वरी सोनवणे, चौथीतून सुमीत धनगर, पाचवीतून भाग्यश्री मोरे, सहावीतून कृष्णा मोरे, सातवीतून आकाश मोरे, आठवीतून अस्मिता भील प्रथम आली. विजेत्या विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण करण्यात येणार आहे. शिवछत्रपती रंगभरण स्पर्धा यशस्वीतेसाठी ग्रेडेड मुख्याध्यापक तुषार लोहार, विनोद जयकर, डॉ. जगदीश पाटील, मंजुषा पाठक, सुनंदा रोझोदकर, गणेश तांबे, सविता निंभोरे, श्याम चिमणकर आदींनी परिश्रम घेतले.