Wednesday, March 26, 2025
Homeजळगावसत्य आणि सदाचाराचा मार्ग दाखवणारी दिशादर्शक गीता - हभप चंद्रकांत महाराज

सत्य आणि सदाचाराचा मार्ग दाखवणारी दिशादर्शक गीता – हभप चंद्रकांत महाराज

सत्य आणि सदाचाराचा मार्ग दाखवणारी दिशादर्शक गीता – हभप चंद्रकांत महाराज

भुसावळ  खानदेश लाईव्ह न्युज  प्रतिनिधी श्रीमद्भगवद्गीतेची व्याप्ती वैश्विक आहे. तिची शिकवण जातीधर्माच्या बंधनापलीकडील आहे. जगातील सर्वोत्कृष्ट आध्यात्मिक ग्रंथांपैकी गीता आहे. गीतेच्या अभ्यासातून मिळणारी शांती आणि भव्यता अतुलनीय आहे. कृष्णाने सांगितलेले पूर्ण सत्य म्हणजेच ही गीता आहे. श्रीकृष्णाने अर्जुनाला कुरूक्षेत्रावर दिलेले ज्ञान व तत्त्वज्ञान हे सर्व गीतेत उलगडत जाते. त्यामुळे मानवी आयुष्याला सत्य आणि सदाचाराचा मार्ग दाखवणारी नैतिक दिशादर्शक म्हणून गीतेचे महत्त्व अनन्यसाधारण आहे, असे प्रतिपादन हभप चंद्रकांत महाराज साकरीकर यांनी येथे केले.

 

भुसावळ येथील दूर्गा कॉलनीत मोक्षदा एकादशी गीता जयंतीनिमित्त आयोजित गीतापठन कार्यक्रमात ते बोलत होते. प्रारंभी परिसरातील सुमारे पन्नास महिलांनी सामूहिक गीतापाठ म्हटला. गीतेचे एकूण अठरा अध्याय व सातशे श्लोक सर्वांनी अडीच तासात पूर्ण केले. यावेळी लक्ष्मण महाराज चिखलीकर उपस्थित होते. त्यानंतर उपस्थित भाविकांशी संवाद साधताना हभप चंद्रकांत महाराज साकरीकर यांनी गीतेचे महत्त्व सांगितले. ते म्हणाले की, गीतेतल्या आध्यात्मिक ज्ञानाने जगभरात लाखो लोकांचे आयुष्य उजळून टाकले आहे. त्यांना एक नवा दृष्टिकोन दिला आहे. सगळ्याच दृष्टीने गीता ही आयुष्यात वरची पातळी गाठण्याची पायरी आहे. गीतेची सर्वाधिक मोलाची शिकवण म्हणजे आपल्या कर्माच्या फळांची अपेक्षा आपण न करणे. एक प्रकारे हीच शिकवण आपल्याला आपल्या कार्याप्रती नि:स्वार्थी बनवते. आपले कार्य ईश्वरचरणी अर्पण करायचा विचार देते. निस्वार्थीपणा ही आध्यात्मिक उद्धाराची पहिली पायरी आहे, असे गीता सांगते. कठीण परिस्थितीतही जीवनाला धैर्याने सामोरे जाण्यासाठीचा समतोल गीता देते, असेही ते म्हणाले. दरवर्षी गीता जयंतीनिमित्त होणाऱ्या गीतापाठ कार्यक्रमाचा लाभ परिसरातील भाविकांनी घेतला.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या