Wednesday, March 26, 2025
Homeजळगावसृजनशीलतेसाठी विचारांची सकारात्मक अभिव्यक्ती व्हायला हवी

सृजनशीलतेसाठी विचारांची सकारात्मक अभिव्यक्ती व्हायला हवी

सृजनशीलतेसाठी विचारांची सकारात्मक अभिव्यक्ती व्हायला हवी

आठव्या खान्देशस्तरीय कुमार साहित्य संमेलनाच्या समारोपसंगी डॉ. जगदीश पाटील यांनी साधला विद्यार्थ्यांशी संवाद

जळगाव –   खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी  आपल्या मनातील विचार, कल्पना आणि भावना व्यक्त करण्याचे उत्तम साधन म्हणजे भाषा होय. याच भाषेच्या माध्यमातून आपण सकारात्मक विचारांची अभिव्यक्ती करत राहिलो तर ती उत्तम सृजनशीलता होत असते, असे प्रतिपादन बालभारतीच्या मराठी भाषा अभ्यास मंडळाचे सदस्य डॉ. जगदीश पाटील यांनी येथे केले.

जळगाव येथील विवेकानंद प्रतिष्ठान आणि महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने मराठी भाषा गौरव दिनाचे औचित्य साधून कै. श्रीमती ब. गो. शानबाग विद्यालयाच्या प्रांगणात आयोजित आठव्या खान्देशस्तरीय कुमार साहित्य संमेलनाच्या समारोपाप्रसंगी डॉ. जगदीश पाटील यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. यावेळी व्यासपीठावर सांस्कृतिक विभाग प्रमुख किरण सोहळे व डॉ. अर्चना खानापूरकर उपस्थित होते. प्रवीण पाटील सर यांनी डॉ. जगदीश पाटील यांचा परिचय करून दिला. सूत्रसंचालन गौरवी सोनवणे व नंदिनी देसले यांनी केले. आठव्या खान्देशस्तरीय कुमार साहित्य संमेलनांतर्गत विविध शाळांचे संमेलन तालुकास्तरावर घेण्यात आले. त्यानंतर जिल्हास्तरावर निवड फेरी पार पडली. अहिल्यादेवी होळकर नगरी कै. श्रीमती ब. गो. शानबाग विद्यालयाच्या प्रांगणात विवेकानंद प्रतिष्ठानच्या विविध शाळांच्या निवडक सुमारे दीडशे विद्यार्थ्यांचे कुमार साहित्य संमेलन मराठी भाषा गौरवदिनी पार पडले.

 

उद्घाटन सत्रात महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळाचे सदस्य प्रा.डॉ. आशुतोष पाटील, विवेकानंद प्रतिष्ठानचे सचिव विनोद पाटील, मुख्याध्यापक ज्ञानेश्वर पाटील, सांस्कृतिक प्रमुख किरण सोहळे उपस्थित होते. त्यानंतर दिवसभरात विद्यार्थ्यांनी कथाकथन, कविता, नाट्य, अभिवाचन, प्रकट मुलाखत, परिसंवाद आदींचे सादरीकरण केले. काव्यवाचनात 50 नवोदीत विद्यार्थी कवी, अभिवाचनात 9 गटातील 47 विद्यार्थी व कथाकथन स्पर्धेत 25 विद्यार्थ्यांचा सहभाग होता. डॉ. निलश्री सहजे संमेलनाच्या तीन भागांचा प्रवास मांडला. विद्यार्थ्यांनी संमेलनाविषयीचे अनुभव कथन केले.

समारोपाप्रसंगी बालभारतीच्या मराठी भाषा अभ्यास मंडळाचे सदस्य डॉ. जगदीश पाटील यांनी मराठी भाषा गौरव दिनाचे औचित्य साधून विद्यार्थ्यांशी संवाद साधला. भाषेच्या माध्यमातून आपण ज्ञान मिळवतो. ते समजून घेतो आणि उपयोगात आणतो. सोबतच भाषेचा अधिकाधिक उपयोग करून आपण आपल्या विचारांची सातत्याने सकारात्मक अभिव्यक्ती करत राहिलो तर आपली वाटचाल सृजनशीलतेकडे होत असते. त्यामुळे आपण सकारात्मक विचारांचे लेखन सातत्याने करत राहिल्यास आपल्या हातून भविष्यात खूप चांगल्या पद्धतीची साहित्य निर्मिती होऊ शकेल, असा आशावाद डॉ. जगदीश पाटील यांनी व्यक्त केला. अध्यक्षीय मनोगत डॉ. अर्चना खानापूरकर यांनी व्यक्त केले. आभार प्रदर्शन सौ. तेजस्वी बाविस्कर यांनी केले. यशस्वीतेसाठी प्रवीण पाटील, सौ. भारती माळी यांनी परिश्रम घेतले. यावेळी विवेकानंद प्रतिष्ठान संचलित विविध शाळांचे शिक्षक व विद्यार्थी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या