सेवानिवृत्त मुख्याध्यापकाचे घर चोरट्यांनी फोडले !
जळगाव खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – आईला भेटण्यासाठी गेलेल्या सेवानिवृत्त मुख्याध्यापक अनिल लक्ष्मण सपकाळे (वय ६०) यांच्या घरात चोरट्यांनी डल्ला मारला. ही घटना मंगळवारी दुपारच्या सुमारासच्या सुमारास गुजराल पेट्रोलपंपा शेजारील निवृत्तीनगरातील संकल्पसिद्धी अपार्टमेंटमध्ये घडली. याठिकाणाहून चोरट्यांनी १ लाख ३५ हजार रुपयांचा सोने चांदीचे दागिने चोरुन नेले असून याप्रकरणी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सविस्तर वृत्तांत असे की, शहरातील गुजराल पेट्रोलपंपा शेजारील निवृत्ती नगरातील संकल्पसिद्धी अर्पाटमेंटमध्ये सेवानिवृत्त मुख्याध्यापक अनिल सपकाळे हे कुटुंबियांसह वास्तवयास आहेत. त्यांचा मुलगा हा म्युझिक कंपोझर असल्याने तो मुंबईत राहत असून त्यांचे मोठे भाऊ रमेश सपकाळे हे पिंप्राळा परिसरात राहतात. मंगळवार दि. १८ रोजी दुपारी सव्वा तीन वाजेच्या सुमारास अनिल सपकाळे हे पत्नी व सूनेला घेवून त्यांच्या आईला भेटण्यासाठी मोठ्या भावाकडे गेले होते. आईची भेट झाल्यानंतर ते पावणेचार वाजेच्या सुमारास पुन्हा घरी परतले. त्यावेळी त्यांना घराच्या मुख्य दरवाजाला लावलेले कुलूप तुटलेले होते तर घराचा दरवाजा देखील उघडा होता.
घरात चोरी झाल्याचे लक्षात येताच सपकाळेयांनी डायल ११२ वर संपर्क साधून घटनेची माहिती दिली. त्यानुसार जिल्हापेठ पोलीस ठाण्याचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी चौकशी केल्यानंतर रात्री अनिल सपकाळे यांनी पोलिसात तक्रार दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.