स्वतःपासून बदलाला सुरुवात करा यश तुमचेच : कॅप्टन प्रा. डॉ. राजेंद्र राजपूत यांचे पारितोषिक वितरण प्रसंगी मुलांना आवाहन
फैजपूर : खान्देश लाईव्ह प्रतिनिधी
शाळा व शिक्षक कल्पवृक्ष असतात त्यांच्या छत्रछायेखाली मुलांनी आपल्या भविष्याच्या अपेक्षांची पूर्तता करून घ्यावी. स्वतः पासून बदलाला सुरुवात करा, स्वप्न बघा व त्याची पूर्ती करण्यासाठी प्रयत्न करा. स्वतःच्या मेहनतीचे कष्टाचे महत्त्व लक्षात घ्या अशी भावनिक साद घालून वेगवेगळी उदाहरणे देऊन कॅप्टन डॉ. राजेंद्र राजपूत यांनी मुलांना हसत खेळत खिळवून ठेवले.
आमोदे तालुका यावल येथील घनश्याम काशीराम विद्यालय या शाळेत
वार्षिक पारितोषिक वितरणाचा कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी धनाजी नाना महाविद्यालयाचे प्रा. डॉ. राजेंद्र राजपूत होते.
घ.का. विद्यालयाचा सन २०२३-२४ या शैक्षणिक वर्षातील पारितोषिक वितरण कार्यक्रम नुकताच संपन्न झाला. आमोदे शिक्षण प्रसारक मंडळ आमोदे या संस्थेकडे अनेक दात्यांनी रुपये ४ लाख ४९ हजार ४४८ ची ठेव ठेवलेली असून त्यावर येणारे रुपये ३१ हजार ८९७ रुपये व्याज विद्यार्थ्यांना पारितोषिक रूपाने दरवर्षी वितरित केले जाते. यावर्षी इयत्ता दहावीत प्रथम आलेली कीर्ती ललित पाटील या विद्यार्थिनीला सर्वाधिक रुपये ५४६०/- बक्षीस देण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व अतिथी परिचय मुख्याध्यापक एस. बी. बोठे यांनी केले.
याप्रसंगी प्रथम आलेली किर्ती पाटील व इ १० वी ची अवंतिका तायडे यांनी मनोगत व्यक्त केले
तसेच जयंत वानखेडे यांना उपक्रमशील शिक्षक म्हणून गौरविण्यात आले.
क्रीडाशिक्षक एन. सी. पाटील यांनी नासिक येथील धावण्याच्या शर्यतीत मिळविलेल्या यशाबद्दल त्यांचाही विशेष सत्कार संस्थेच्या वतीने करण्यात आला. कार्यक्रमास विद्यार्थी पालक ललित पाटील पिंपरुळ यांनी सर्वांना स्नेहभोजन दिले. पारितोषिक प्राप्त विद्यार्थ्यांना कार्यक्रमाचे अध्यक्ष कॅप्टन राजेंद्र राजपूत यांच्या हस्ते पारितोषिके वितरित करण्यात आली. कार्यक्रमाचे अध्यक्ष कॅप्टन राजेंद्र राजपूत यांचा सत्कार संस्थेचे अध्यक्ष उमेश पाटील यांनी केला.
कार्यक्रमास उपाध्यक्ष विनायक पाटील, चिटणीस प्रा. उमाकांत पाटील,
चेअरमन ललित महाजन, सदस्य प्रमोद वाघुळदे, धनराज चौधरी, नामदेव पाटील,
एकनाथ लोखंडे, वैभव चौधरी,
यांची उपस्थिती लाभली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ईश्वर चौधरी सर यांनी केले. बक्षीस वाचन ललित पिंपरकर सर यांनी केले तर आभार पराग पाटील सर यांनी व्यक्त केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी घ. का. विद्यालयाचे सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच खाजगी प्राथमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक सुनील फेगडे व शिक्षक कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.