२२ वर्षीय तरुणाने घेतला टोकाचा निर्णय !
जळगाव खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – आई-वडील शेतात गेले असताना घरी एकटाच असलेल्या खिलचंद पंडित कोळी (२२ वर्ष, रा. असोदा, ता. जळगाव) या तरुणाने गळफास घेत आत्महत्या केली. ही घटना सोमवारी (दि.२०) दुपारी १२ वाजेच्या सुमारास उघडकीस आली. याप्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
याबाबत सविस्तर वृत्तांत असे की, खिलचंदचा नुकताच साखरपुडा झाला असून, घरात त्याच्या लग्नाची तयारी सुरू असतानाच त्याने टोकाचे पाऊल उचलले. असोदा येथील खिलचंद कोळी हा तरुण शेती करून कुटुंबाला हातभार लावत होता. सोमवारी सकाळी त्याचे आई-वडील शेतात गेले असताना खिलचंद घरी एकटाच होता. त्याने घरात छताला गळफास घेतला. ही घटना परिसरात राहणाऱ्या तरुणाच्या लक्षात येताच त्याने खिलचंदच्या आई- वडिलांना माहिती दिली. ते घरी पोहोचले. ग्रामस्थांच्या मदतीने त्याला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. खिलचंद याचा नुकताच साखरपुडा झाला होता. २२ एप्रिल रोजी त्याचे लग्न होणार होते. एकुलता एक मुलाच्या लग्नाची कुटुंबीयांकडून जोरदार तयारी केली जात होती. मात्र, त्यापूर्वीच त्याने आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलले.