अजय बढे यांची ४५ लाख रुपयात फसवणूक : निवृत्त वरिष्ठ अभियंत्यावर गुन्हा दाखल !
जळगाव खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – सीएसआर फंड प्राप्त करून शेततळ्याचे कामे मिळवून देण्याचे आमिष दाखवून अजय भागवत बढे यांची ४५ लाख रुपयात फसवणूक केल्याप्रकरणी तापी पाटबंधारे विभागाचे निवृत्त वरिष्ठ अभियंता व्ही. डी. पाटील यांच्यासह कार्यकारी अभियंता गोकुळ महाजन व अन्य सात जणांविरुद्ध रामानंद नगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या संदर्भात तक्रारदार अजय बढे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, तापी पाटबंधारे विकास महामंडळाकडून शेततळ्याच्या कामांची निविदा प्रक्रिया राबविण्यापूर्वी निवृत्त वरिष्ठ अभियंता व्ही.डी. पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांनी शेततळ्याचे काम मिळवून देतो असे सांगून ४५ लाख रुपयांत फसवणूक केली होती. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच अजय बढे यांनी तत्कालीन पोलिस अधीक्षक एम राजकुमार यांची भेट घेऊन तक्रार केली होती. तक्रारीचे गांभीर्य लक्षात घेऊन तत्कालीन पोलिस अधीक्षकांनी सदर तक्रारीची चौकशी आर्थिक गुन्हे शाखेकडे सोपविली होती. मात्र, या प्रकरणी फक्त दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करावा असे अजय बढे यांना कळविले होते.आर्थिक गुन्हे शाखेच्या निर्णयाविरुद्ध अजय बढे यांनी जळगाव येथील कनिष्ठ न्यायालयात दाद मागितली होती. न्यायालयाने सर्व पुरावे लक्षात घेवून व्ही. डी. पाटील, कार्यकारी अभियंता गोकुळ श्रावण महाजन व इतरांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते.
कनिष्ठ न्यायालयाच्या आदेशाविरुद्ध निवृत्त वरिष्ठ अभियंता व्ही.डी. पाटील व इतरांनी जिल्हा न्यायालयात आव्हान दिले होते. या प्रकरणी सुनावणी होऊन अपर जिल्हा न्यायाधीश न्या. एस.आर. पवार यांनी कनिष्ठ न्यायालयाने दिलेला निर्णय कायम ठेवला.