अल्पवयीन मुलीला पळविने पडले महागात ; दोघांना अटक!
यावल खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – तालुक्यातील एका गावातून एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीला कोणीतरी अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळवून नेले होते. या प्रकरणी ३० नोव्हेंबर रोजी यावल पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता, तर या प्रकरणी यावल पोलिसांनी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फर्दापूर येथून दोन तरुणांना अटक केली आहे.
याबाबत सविस्तर वृत्तांत असे की, या प्रकरणी पीडित अल्पवयीन मुलीच्या कुटुंबाकडून यावल पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्याचा तपास पोलिस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक सुनील मोरे, पोलिस नाईक किशोर परदेशी, अनिल पाटील या पथकाने केला. त्यांनी या मुलीला छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फर्दापूर येथून ताब्यात घेतले व तिच्या कुटुंबाला सोपविले आणि तिला फूस लावून पळवून नेणाऱ्या पवन संतोष ढवले (वय १८) व केदार संतोष पवार (वय १८) दोन्ही रा.फर्दापूर जि.छत्रपती संभाजीनगर यांना पोलिसांनी अटक केली. या दोघांना सोमवारी भुसावळ येथील विशेष बाल न्यायालयात हजर केले असता, त्यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक सुनील मोरे करीत आहेत.