आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्राचे 20 रोजी मोदींच्या हस्ते उद्घाटन
फैजपूर : प्रतिनिधी येथील तापी परिसर विद्या मंडळ संचलित धनाजी नाना महाविद्यालयात विद्यार्थ्यांना रोजगारक्षम बनवण्याच्या उद्देशातून *आचार्य चाणक्य कौशल्य केंद्र* महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास विभागाच्या मान्यतेने सुरू करण्यात येणार आहे.
या कौशल्य विकास केंद्राचे उद्घाटन देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या शुभ हस्ते होणार असून या प्रसंगी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती लाभणार आहे.
राज्यातील विविध महाविद्यालयातून 1000 आर्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र स्थापित करण्यात येणार असून त्यापैकी एक कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव संलग्नित फैजपूर येथील धनाजी नाना महाविद्यालयाला मिळत असून याबद्दल व्यवस्थापन मंडळाने महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ राजेंद्र बी वाघुळदे, उपप्राचार्य, प्राध्यापक यांचे अभिनंदन केले आहे.
या केंद्राचे उद्घाटन शुक्रवारी 20 सप्टेंबर रोजी भारताचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या शुभ हस्ते दूरदृश्य प्रणालीद्वारे दुपारी साडेबारा वाजता होणार आहे. याचे लाईव्ह प्रक्षेपण महाविद्यालयाच्या कॉन्फरन्स हॉल येथे आयोजित करण्यात आले आहे.
कौशल्य विकास केंद्राचा हा उपक्रम केंद्र सरकारचा असून तो महाराष्ट्र सरकार राज्यात राबवणार आहे. याबाबतीत महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ राजेंद्र बी वाघुळदे यांनी सांगितले की, अशा प्रकारचे कौशल्य विकास केंद्र स्थापन करणे ही काळाची गरज असून पारंपारिक पदवीकडे विद्यार्थ्यांच्या बघण्याचा दृष्टिकोन बदलला आहे. यामुळे ज्या उदात्त हेतूने परिसरात महाविद्यालयाची स्थापना झाली आहे त्या स्वप्नांना पाठबळ मिळण्याच्या हेतूने हे कौशल्य विकास केंद्र अतिआवश्यक असून याचा महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा व ऑनलाइन पद्धतीने होणाऱ्या उद्घाटन समारंभाला जास्तीत जास्त संख्येने उपस्थित रहावे असेही आवाहन केले.