आमोदा येथील अवैध गौण खनिज चोरी प्रकरणी निलेश राणेची महसूल मंत्र्याकडे तक्रार : अधिकाऱ्यांवर प्रशासकीय कारवाई करण्याची केली मागणी
फैजपूर : खान्देश लाईव्ह प्रतिनिधी
फैजपूर येथील माजी नगराध्यक्ष निलेश राणे
यांनी यावल तालुक्यातील आमोदा शिवारातील मधुकर सहकारी साखर कारखान्याच्या जमिनीवरील गौण खनिज अवैधरीत्या विक्री होत असल्याचे तहसीलदार, यावल यांचे निदर्शनास वेळोवेळी आणून दिले. दि.२९/०४/२०२४ पासून सातत्याने गौण खनिज चोरी होत असल्याचे वारंवार स्मरणपत्रे देऊन व भेटून तहसीलदार व मा. प्रांताधिकारी, फैजपूर यांचे निदर्शनास आणून दिले आहे. परंतु प्रशासनाने आपल्या आर्थिक लाभापोटी या बाबींकडे दुर्लक्ष केल्याचे निलेश राणे यांनी सांगितले. तहसीलदार व प्रांत यांची याप्रकरणी मिली भगत असल्याने निलेश राणे यांनी महसूल मंत्री नामदार चंद्रकांत बावनकुळे यांच्याकडे तक्रार केली. सविस्तर वृत्त असे की, यावल तालुक्यातील आमोदे गावाजवळ असलेल्या मधुकर सहकारी साखर कारखान्याच्या मालकीच्या मोर नदीकाठी असलेल्या शेतातून
गेल्या वर्षभरापासून गौण खनिजची दिवसाढवळ्या चोरी होत असल्याचे संबंधितांना निदर्शनास आणून दिले. सदर बाबीची त्यांनी मा. तहसीलदार, यावल कडे तक्रार करूनही संबंधित तक्रारी बाबत शासन दरबारी किरकोळ कारवाई करीत प्रकरण मिटवले. मात्र त्यानंतर गौण खनिज माफियांनी येथील चोरी थांबवलेली नसून आजही ही चोरी दिवसा ढवळ्या सुरु आहे.
दि.१६ एप्रिल रोजी या ठिकाणी दिवसा निलेश राणे यांनी स्वतः पाहणी केली असता दोन जेसीबी व चार डम्पर गौण खनिज चोरून नेत असताना आढळले. ही बाब त्याच वेळेस मा.प्रांतधिकारी, फैजपूर, तहसीलदार यावल यांना व मा.अप्पर जिल्हाधिकारी, जळगाव यांना फोन करून त्याठीकांचे व्हिडीओ पाठवले व तत्काळ भेट देण्यास विनंती करूनही त्यांनी त्याठिकाणी भेट न देता गौण खनिज चोरीस शासकीय अभय दिले. शासनाच्या डोळ्यात धूळ टाकून गौण खनिज चोरी व विक्री राजरोस पणे सुरु आहे व नागरिकांनी हि चोरी लक्षात आणूनही भरमसाठ आर्थिक आमिषापोटी यावल तहसीलदार व महसूल प्रशासन यास शासकीय संरक्षण देत आहे. याबाबत दि.१७ एप्रिल रोजी प्रांताधिकारी यांचे
कार्यालयात बैठकीत संबंधित तलाठी यांना नोटीस देऊन सदरील विषयी अहवाल करून म. जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवण्याचे प्रांताधिकारी यांनी सांगितले.
तरी आमोदा शिवारातील मधुकर साखर कारखान्याच्या जमिनीवरील वर्षभरापासून सुरु असलेल्या गौण खनिज चोरी साठी शासकीय अभय देऊन व जाणूनबुजून कार्यवाही न केल्याचे स्पष्ट असून – शासन निर्णय – शासन परिपत्रक -गौखनि १०/०३१६/प्र.क्र.२०४/ख, १४/०६/२०१७ आणि गौखनी१०/०२२५/प्र.क्र.७२/ख-२, दि. ०७/०३/२०२५ नुसार त्वरित तहसीलदार, यावल व जबाबदार कर्मचाऱ्यांवर प्रशासकीय कार्यवाही करण्यास तत्काळ चौकशी करून आदेश व्हावेत अशी मागणी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे कडे फैजपूर येथील निलेश राणे यांनी केली आहे.