नाटिका व नृत्याद्वारे श्रीकृष्ण जन्मोत्सवासह कृष्णलीला सादरीकरण
भुसावळ खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – भुसावळ येथील कमल गणपती हॉलमध्ये इस्कॉनतर्फे श्रीकृष्ण जन्माष्टमीचे औचित्य साधून श्रीकृष्ण जन्मोत्सव साजरा करण्यात आला. लहान बालिका, मुली व महिलांनी वेशभूषा धारण करून नाटिका व नृत्याद्वारे श्रीकृष्ण जन्मोत्सवासह कृष्णलीला सादरीकरण केले. प्रसंगी उभारण्यात आलेल्या राधाकृष्णाच्या शृंगार दर्शनाचा हजारो भाविकांनी लाभ घेतला.
श्रीकृष्ण जन्मोत्सवाचे प्रमुख आकर्षण
म्हणजे श्रीराधाकृष्ण विग्रहाचे नैसर्गिक फळ व सुगंधित फुलांनी महाअभिषेक करण्यात येत होता. तसेच शेजारी राधाकृष्ण मूर्तीचे शृंगार दर्शन भाविकांसाठी उपलब्ध करून देण्यात आले होते. प्रारंभी हरे कृष्णा महामंत्राचे नामस्मरण कीर्तन करण्यात आले. त्यानंतर राधाकृष्णाच्या विग्रहाचे मुख्य व्यवस्थापक प्रभुजी रासयात्रादास यांच्या हस्ते महाअभिषेक करण्यात आला त्यानंतर समाजासाठी वैदिक संस्कृती जोपासणे किती व्यावहारिक आहे, हा संदेश नृत्य व नाटिकेच्या माध्यमातून देण्यात आला. आजची पिढी आधुनिकीकरणामुळे भरकटत चालली आहे आपली वैदिक संस्कृती जोपासल्यामुळे जीवनात बदल होतो. तरूण पिढीचे नैतिक मूल्यांकन सुधारण्याचे कार्य इस्कॉन भुसावळ जोमाने करत असल्याचेही कार्यक्रमात प्रखरतेने जाणवले. त्यानंतर प्रभुजी रासयात्रादास यांचे प्रवचन पार पडले. यावेळी मुंबई इस्कॉन मंदिराचे वरिष्ठ नंदगोप प्रभुजी, श्रमानंद प्रभुजी, जितू प्रभुजी, मोहन प्रभुजी यांच्यासह मंदिराच्या निवासी भक्तांची उपस्थिती होती. त्यानंतर भुसावळ शहरात लवकरच तयार होणार्या नवीन इस्कॉन मंदिराची एक डॉक्युमेंटरी दाखविण्यात आली. त्यात इस्कॉन भुसावळ मंदिर भुसावळकरांसाठी करत असलेल्या सामाजिक कार्याची रूपरेखा दाखवण्यात आली. त्यानंतर उपस्थित महाराजांच्या व यजमानांच्या हस्ते महाआरती करण्यात आली. त्यानंतर महाप्रसाद वितरित करण्यात आला. कार्यक्रमाचा हजारो भाविकांनी लाभ घेतला. यशस्वीतेसाठी सर्व इस्कॉन भुसावळ भक्त वृंदांनी परिश्रम घेतले.