२ लाखांचा गुटखासह वाहन जप्त ; भुसावळसह जळगावातील एकाला अटक !
रावेर खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – महाराष्ट्र राज्यात उत्पादन, विक्री, वितरण आणि साठा करणे तसेच वाहतुकीस प्रतिबंधित सुगंधीत तंबाखूजन्य पदार्थासह गुटखा हा कब्जात बाळगुन पुरवठा करण्यासाठी वाहतूक करतांना दोन आरोपींविरुध्द सावदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सविस्तर वृत्तांत असे की, दोघे संशयितांना मुद्देमाल, वाहनासह ताब्यात घेतले आहे. सावदा पोलीस ठाण्याच्या हद्दीत आरोपी अनिल ओंकार पाटील (वय ४० रा. शिवाजीनगर, जळगाव), रोहीत मुकेश बरकले (वय २२, रा.शिवपूर, ता. भुसावळ) हे सुगंधित तंबाखु व गुटखा हा त्यांच्या कब्जात बाळगुन पुरवठा करण्यासाठी वाहतूक करीत असल्याबाबतची गोपनिय बातमी सहा. पोलीस निरीक्षक विशाल पाटील यांना मिळाल्याने त्यांनी तात्काळ दोघांना मुद्देमालासह रंगेहाथ पकडण्याकामी सावदा पोलीस स्टेशनकडील पोलीस पथकास रवाना करुन आरोपी यांच्यावर सापळा रचुन आरोपींना लुमखेडा, ता. रावेर शिवारात सावदा ते हतनूर धरण रस्त्यावर पाटाचे चारीजवळ पकडून त्यांच्याजवळून दोन लाख ५६० रुपये किंमतीचा सुगंधित तंबाखु व गुटखा दुचाकीसह मिळुन आला आहे.
दरम्यान, ही कारवाई सहा. पोलीस निरीक्षक विशाल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक राहुल सानप, पोहेकॉ. संजीव चौधरी, पो. कॉ. सुनील कुरकुरे, बबन तडवी, उमेश पाटील, विनोद तडवी, समीर तडवी, श्री. पोहेकर, संजय तडवी, खोडपे दादा यांनी केली आहे.