जिनिंग मालकाची ८६ लाखांत फसवणूक ; धरणगावात घडली घटना
धरणगाव खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – धरणगाव येथील जिनिंगमधून तब्बल ८६ लाख रुपये किंमतीच्या रुईच्या गाठी घेऊन पैसे देण्यास टाळाटाळ करणाऱ्या तामिळनाडूतील तीन जणांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ब्रोकर भावेश शहा (रा. कोईम्बतूर, तामीलनाडू), रंजीता इंटरप्रायझेस रायचूरचे मालक भाव्या नायक आणि पायोनियर इंटरप्रायझेस रायचूरच्या मालक बबीता संचेती अशी या गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.
याबाबत सविस्तर वृत्तांत असे की,धरणगाव येथील वल्लभ जिनिंगचे मालक हरीश सुभाष अग्रवाल यांनी पोलिसात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, वरील तीनही जणांनी आपला विश्वास संपादन केला. त्यानंतर २६ ऑगस्ट २०२२ रोजी ११० रूई गाठी व दि. ११ सप्टेंबर २०२२ रोजी १०० रूई गाठी त्यांनी खरेदी केल्या. दि. २४ ऑगस्ट २०२२ ते २० मार्च २०२४ या दरम्यान या गाठींची खरेदी त्यांनी केली. याची किंमत जवळपास ८६ लाख ९६ हजार रुपये आहे. परंतु वेळोवेळी मागणी करुनही त्यांनी या गाठींचे पैसे दिले नाहीत. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच अग्रवाल यांनी वरील तीनही जणांविरुद्ध फिर्याद दिली. त्यावरुन गुन्हा दाखल केला आहे. तपास पोलीस निरीक्षक पवन देसले हे करीत आहेत.