जिल्ह्यातील एकाची दक्षिण आफ्रिकेतील स्वाझीलँड मध्ये आत्महत्या !
रावेर खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – तालुक्यातील खिरवड येथील रहिवाशी गोकुळ सुकलाल गाढे (४४) हे कामानिमित्त दक्षिण आफ्रिकेतील स्वाझीलँड मध्ये असताना त्यांनी तेथे आत्महत्या केली. ही घटना १३ रोजी कंपनीच्या वसाहतीत घडली.
याबाबत सविस्तर वृत्तांत असे की, गोकुळ गाढे हे खोपोली (मुंबई) येथून दोन वर्षांपासून दक्षिण आफ्रिकेतील ईस्वातिनी तथा स्वाझीलँड देशातील मत्सफा या औद्योगिक शहरातील ओमी ऑईल कंपनीत तेल शुध्दीकरण प्रकल्प संचालक म्हणून सेवारत होते. अवघ्या दोन महिन्यांपुर्वी सुटीवर मायदेशी घरी येवून परत गेल्यानंतर दसऱ्याच्या दुसऱ्याच दिवशी १३ रोजी त्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. दसऱ्याच्या रात्री मुलगी आकांक्षा व पत्नी लक्ष्मी यांनी व्हिडीओ कॉलवर त्यांना दसऱ्याच्या शुभेच्छाही दिल्या होत्या. दरम्यान, तब्बल चार दिवस शीतपेटीत मृतदेह राखून ठेवल्यानंतर गुरूवारी १७ रोजी शवविच्छेदन करून संबंधित दुतावासाने हे पार्थिव दोन टप्प्यांतील विमान प्रवासात पाठवण्याची शक्यता वर्तविली होती.मात्र ही शक्यता जिल्हा प्रशासनानद्वारे मावळल्याने त्यांच्या शोकाकुल कुटुंबीयांना दुःख अनावर झाले आहे.गोकुळ गाढे या नववी पर्यंत शिक्षण घेतलेल्या युवकाने स्वतः च्या पायावर उभे राहण्यासाठी मुंबईत तेल कंपनीत प्रदीर्घ अनुभवातून तेल शुध्दीकरण प्रकल्प संचालक पदापर्यंत मजल मारली.
दरम्यान, सावदा येथील माहेर असलेल्या लक्ष्मीबाई यांच्याशी विवाहबद्ध झाल्यानंतर त्यांनी खोपोली येथे रहिवास केला. मुलगी आकांक्षा, मुलगा अखिलेश व राज हे तीन अपत्ये संसार वेलीवर फुलली. गाढे यांनी आपल्या मुंबईतील मित्रांसोबत परदेशात ४ जुलै २०२२ रोजी नोकरी पत्करली होती.