तापी नदी काठावर गावठी दारुसह दीड हजार लिटर रसायन हस्तगत !
जळगाव खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्यावतीने गावठी दारुच्या हातभट्टी कारवाई करण्यात येऊन १६७ लिटर गावठी दारुसह दीड हजार लिटर रसायन हस्तगत करण्यात आले. ही कारवाई शेळगाव येथे तापी नदी काठावर करण्यात आली.
याबाबत सविस्तर वृत्तांत असे की,नदी काठी गावठी हातभट्टीची दारु तयार करण्यासह दारुची वाहतूक केली जात असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक डॉ. व्ही. टी. भूकन यांना मिळाली. त्यांनी कारवाईच्या सूचना दिल्या. त्यानुसार पथक प्रमुख निरीक्षक डी. एम. चकोर, एस.बी. भगत, एस.एम. मोरे, दुय्यम निरीक्षक जी.डी. अहिरे, ए. डी. पाटील, आर.डी. जंजाळे, डी.एन. पावरा यांनी आसोदा-शेळगाव रस्त्यावर सापळा रचून एका दुचाकीवर गावठी दारू वाहतूक करताना कारवाई केली. तसेच शेळगाव येथे तापी नदीकाठी हातभट्टी निर्मिती केंद्रावर धाड टाकून कच्च्या रसायनासह हातभट्टी दारूचे साहित्य नष्ट केले. कच्चे रसायन, गावठी दारू, दुचाकी असा एकूण एक लाख २३ हजार ८३० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. यात तीन गुन्हे दाखल करण्यात आले.