फैजपूर येथे बौद्ध समाजाचा शांततामय मोर्चा; महाबोधी महाविहार मुक्तीसाठी जोरदार मागणी
फैजपूर | प्रतिनिधी, खानदेश लाईव्ह न्युज १९४९ चा बोधगया मंदिर कायदा रद्द करून बोधगया महाबोधी महाविहारावर बौद्ध धर्माचे पूर्ण नियंत्रण प्रस्थापित व्हावे, तसेच बिहार राज्य पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या भिक्षू संघ आणि बौद्ध बांधवांची बिनशर्त सुटका व्हावी, या मागण्यांसाठी आज फैजपूर येथे यावल आणि रावेर तालुक्यातील बौद्ध समाज बांधवांनी शांततेच्या मार्गाने प्रांत कार्यालयावर मोर्चा काढला. या आंदोलनाला भारत सरकार, बिहार सरकार आणि राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने लवकरात लवकर पाठिंबा द्यावा, अशी जोरदार मागणी बौद्ध समाजाने केली.
सकाळी फैजपूर शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून आणि अभिवादन करून मोर्चाला सुरुवात झाली. यावल आणि रावेर तालुक्यातील बौद्ध बांधव मोठ्या संख्येने या मोर्चात सहभागी झाले होते. मोर्चा डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून सुभाष चौक, अंकलेश्वर-बऱ्हाणपूर पूर महामार्ग मार्गे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्गावरून प्रांत कार्यालयापर्यंत काढण्यात आला. प्रांत कार्यालयावर धडकताच बौद्ध समाज बांधवांनी आपापली मनोगते व्यक्त केली.
या वेळी उपस्थितांनी १९४९ चा कायदा रद्द करण्याची मागणी करताना सांगितले की, “बोधगया महाबोधी महाविहार हे बौद्ध धर्मियांचे पवित्र स्थळ असून, त्यावर बौद्धांचे पूर्ण नियंत्रण असायला हवे. बिहार राज्य पोलिसांनी भिक्षू संघ आणि बौद्धांना ताब्यात घेतले आहे, त्यांची तात्काळ बिनशर्त सुटका झाली पाहिजे.” भारतीय बौद्ध महासभा आणि सर्व बौद्ध समाज बांधवांनी ही मागणी एकमुखाने लावून धरली.
मोर्चादरम्यान, भिक्षू संघाच्या हस्ते प्रांताधिकारी बबनराव काकडे यांना निवेदन सादर करण्यात आले. या निवेदनातून बौद्ध समाजाच्या मागण्यांना पाठिंबा देण्याचे आवाहन सरकार आणि संबंधित यंत्रणांना करण्यात आले. या प्रसंगी यावल आणि रावेर तालुक्यातील बौद्ध समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. शांततामय पद्धतीने झालेल्या या आंदोलनाने बौद्ध समाजाच्या एकजुटीचे आणि न्यायासाठीच्या दृढनिश्चयाचे दर्शन घडवले. या मोर्चाच्या माध्यमातून बौद्ध समाजाने आपला आवाज बुलंद करत सरकारला या संवेदनशील मुद्द्यावर त्वरित कारवाई करण्याची मागणी केली आहे.