भारतीयांच्या एकतेचे सूत्र म्हणजे संविधान आहे..संविधानात बदल निव्वळ अपप्रचार – सागर शिंदे !
भुसावळ खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – भारतीय संविधानाच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त विवेक विचार मंच आणि सहयोगी संघटनांच्या वतीने राज्यभर सामाजिक संवाद मेळाव्यांचे आयोजन केले जात आहे. भुसावळ तालुक्यातील वंचित घटकांमध्ये कार्य करणाऱ्या सामाजिक नेतृत्व व संस्था संघटनांच्या प्रतिनिधींचा “‘सामाजिक संवाद मेळावा” संपन्न झाला.
या मेळाव्यातून अनुसूचित जाती आणि वंचित घटकांचे प्रश्न, सद्यस्थिती, भारतीय संविधान, आरक्षण, सामाजिक न्यायाच्या विषयासंदर्भात चर्चा – संवाद झाला. मेळाव्यात उपस्थित सामाजिक कार्यकर्त्यांनी सामाजिक न्यायाच्या विविध विषयांवर मते व्यक्त केली. यावेळी मंचावर उपस्थित विवेक विचार मंचाचे राज्य संयोजक सागर शिंदे यांनी उपस्थितांना संबोधित करताना म्हटले की, संविधान हे भारतीयांच्या एकतेचे सूत्र असून कोणाचा बापही संविधान बदलू शकत नाही. संविधानात बदल होणार या राजकीय हेतूने केलेला अपप्रचार आहे. सामाजिक न्याय हा वंचित घटकातील शेवटच्या व्यक्ति पर्यन्त पोहचण्यासाठी सर्वांनी बंधुभावाच्या भूमिकेतून व्यवहार करायला हवा. तसेच फुटीरतावादी शक्तींच्याकडून संविधानाला खरा धोका आहे.
संविधान सरनामा वाचनाने कार्यक्रमाची सुरवात झाली. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन आणि उपस्थितांचे आभार प्रदर्शन पियुष गिजरे यांनी केले. प्रास्ताविक उदय रेलकर, जिल्हा संयोजक यांनी केले. श्री. सागर शिंदे, राज्य संयोजक, विवेक विचार मंच यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.यावेळी शहरातील राजेश्री सुरवाडे, राजश्री सोनवणे, लक्ष्मण सोयंके प्रशांत नरवाडे राहुल तायडे सामाजिक कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.