भुसावळ नगरपरिषद सफाई कामगारांकडून गंभीर आरोप.
अखिल भारतीय सफाई कामगार संघटनेचे प्रदेश सचिव संतोष थामेत यांच्या नेतृत्वाखाली भुसावळ नगरपालिकेच्या सफाई कामगारांनी भुसावळ नगरपालिकेवर जोरदार धडक देत आपल्या विविध मागण्या संदर्भात नगरपालिका प्रशासनावर गंभीर आरोप केले आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की,भुसावळ नगरपरिषदेच्या आस्थापना विभागामार्फत सफाई कामगारांना विविध समस्यांचा सामना करावा लागत असून याबाबत आज बुधवार दिनांक १६ एप्रिल २०२५ रोजी अखिल भारतीय सफाई कामगार संघटनेचे प्रदेश सचिव संतोष थामेत यांच्या नेतृत्वाखाली नगरपरिषदेच्या सफाई कामगारांनी नगरपालिकेवर जोरदार धडक देऊन घेतलेल्या पत्रकार परिषदेत विविध गंभीर आरोप केलेले आहेत.सफाई कामगारांना सेवानिवृत्तीनंतर मिळणारे विविध प्रकारचे लाभ जसे की,भविष्य निर्वाह निधी,ग्रॅज्युएटी, व इतर रकमांबाबत नगरपरिषदेकडे वारंवार मागणी करूनही मिळत नसून हेलपाटे / चकरा मारावे लागत आहे. संघटनेचे प्रदेश सचिव संतोष थामेत यांच्या नेतृत्वात आज झालेल्या पत्रकार परिषदेत सफाई कामगारांनी अनेक गंभीर आरोप करत पैसे देऊनही संबंधित अधिकारी यांचे कडून त्यांचे पगार, पेन्शन,सेवानिवृत्तीनंतर मिळणाऱ्या लाभांच्या रकमांपासून वंचित रहावे लागत आहे.त्यामुळे भुसावळ शहराची वर्षानुवर्षे स्वच्छता करून सेवा करणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. नगरपालिका प्रशासनाकडून अनेक सेवानिवृत्त कामगारांना त्यांच्या हक्काची रक्कम मिळण्याचे प्रस्ताव अजूनही प्रलंबित असून अनेक महिन्यांपासून या लाभाच्या रकमांना मिळण्यास विलंब होत आहे.कर्मचाऱ्यांना त्यांच्या नियमित वेतनाची पगार स्लीप देखील दिली जात नसल्याचा मुद्दा देखील यावेळी चर्चेत आलेला आहे.तसेच काही मयत झालेल्या माजी कर्मचाऱ्यांच्या वारसांना देखील विविध लाभांपासून वंचित ठेवण्यात येत असून त्यांची प्रकरणे अनेक महिन्यांपासून प्रलंबित ठेवण्यात आलेली असल्याचा आरोप करण्यात आलेला आहे.
सर्व मागण्या पूर्ण करू ; प्रांताधिकारी – याप्रकरणी भुसावळ नगरपरिषदेचे प्रशासक तथा प्रांताधिकारी जितेंद्र पाटील यांची प्रतिक्रिया जाणून घेतली असता त्यांनी सांगितले की सफाई कर्मचारी आणि सेवानिवृत्त कर्मचारी आणि त्यांचे वारस हे नगरपालिका प्रशासनाचे अत्यंत महत्त्वाचे कर्मचारी असून जर त्यांना अशा गंभीर समस्या येत असतील, तर त्यांचे तात्काळ निवारण करण्यात येईल. याबाबत येत्या सोमवारी प्रशासकीय बैठक लावण्यात येईल,आणि जर कोणी अधिकारी कर्मचाऱ्यांना जाणीव पूर्वक विविध प्रकारच्या कामांसाठी आणि प्रस्तावांसाठी विनाकारण दिरंगाई करत असेल तर,संबंधित अधिकाऱ्याची चौकशी करून त्याच्यावर योग्य ती कारवाई करण्यात येईल,अशी प्रतिक्रिया दिलेली आहे.