भुसावळ येथील तरूणांचा अपघात : भरधाव चारचाकी आकाशवाणी सर्कलमध्ये घुसली !
जळगाव खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – भुसावळकडून येणारी भरधाव कार नियंत्रित न झाल्याने ती थेट आकाशवाणी चौकातील सर्कलमध्ये घुसली. यामुळे सर्कलचे मोठे नुकसान होण्यासह वाहतूक सिग्नलही कोसळला. शिवाय कारचेही मोठे नुकसान झाले असून सुदैवाने कारमधील दोघांना कोणतीही दुखापत झाली नाही. ही घटना सोमवारी (३ फेब्रुवारी) पहाटे तीन वाजेच्या सुमारास घडली.
या प्रकरणी जंडू कन्स्ट्रक्शनच्या अधिकाऱ्यांनी पोलिसांना केवळ घटनेविषयी पत्राद्वारे कळविले असून कोणतीही फिर्याद दिलेली नाही.भुसावळ येथील दीपक कृष्णा सोनार (३४) व त्यांचे मित्र सुरजसिंग दिनेशसिंग राजपूत (२९, सुरत) हे कारने (क्र. एमएच १९, डीवाय ८८५९) जळगावकडे येत होते. आकाशवाणी चौकात आल्यानंतर ही भरधाव कार थेट सर्कलमध्ये चढली. त्यात सर्कलचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून काही महिन्यांपूर्वीच बसविलेल्या सिग्नलचा खांबही कारच्या धडकेत कोसळला. या घटनेत कारच्या एअर बॅग उघडल्या, त्यामुळे कारमधील दोघांना कोणतीही दुखापत झाली नाही. घटनेची माहिती मिळाल्यानंतर रामानंद नगर पोलिस ठाण्याचे पोहेकॉ चंद्रकांत पाटील हे घटनास्थळी पोहोचले. ते कारमधील दोघांची विचारपूस करीत असताना दीपक सोनार यांनी त्यांना उर्मटपणे उत्तरे देत अरेरावी केली, अशी माहिती पाटील यांनी दिली. कारमधील दोघांनीही मद्यपान केल्याच्या संशयावरून त्यांची वैद्यकीय चाचणीही करण्यात आल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.