मीनाताई ठाकरे संकुल भागात गोळीबार करणाऱ्या ६ सराईत गुन्हेगारांना अटक !
जळगाव खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – जळगाव शहरातील मीनाताई ठाकरे संकुल भागात २४ एप्रिल रोजी झालेल्या गोळीबाराबाबत रामानंदनगर पोलिसांनी सहा सराईत गुन्हेगारांना अटक केली. या कारवाईत पोलिसांनी आरोपींकडून एक गावठी बनावटीचे पिस्तूल आणि इतर घातक शस्त्रे जप्त केली आहेत.
याबाबत सविस्तर वृत्तांत असे की,२४ एप्रिल रोजी मीनाताई ठाकरे संकुल भागात महेंद्र समाधान सपकाळे (२०, रा. पिंप्राळा) हा मित्र भूषण अहिरे याचा वाढदिवस साजरा करत असताना आरोपींनी गोळीबार केला होता.या गुन्ह्याचा तपास करत असताना पोलिसांनी अवघ्या काही दिवसात सहा संशयित आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये विशाल भिका कोळी (पिस्तूलसह), अक्षय ऊर्फ बाब्या बन्सीलाल धोबी, धीरज ऊर्फ वैभव ऊर्फ गोलू कोळी, सागर अरुण भोई ऊर्फ जाड्या भोल्या, नितेश मिलिंद जाधव आणि गिरीश किशोर घुगे यांचा समावेश आहे. पोलिसांनी आरोपी गिरीश घुगे याच्याकडून गावठी बनावटीचे पिस्तूल जप्त केले आहे. याशिवाय घटनास्थळावरून एक जिवंत काडतूस आणि दोन रिकामे काडतुसांचे खोल तसेच एक कोयतादेखील पोलिसांनी हस्तगत केला आहे.