सप्तश्रृंगगडावर दर्शनासाठी पायी जाणारा तरुण
कालव्यात पडल्याने गेला वाहून !
भडगाव खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – तालुक्यातील खेडगाव येथे चैत्र पौर्णिमेनिमित्त सप्तश्रृंगगडावर देवीच्या दर्शनासाठी पायी जाणारा वेरुळी (ता. पाचोरा) येथील सचिन रामू सोनवणे (२५) हा तरुण खेडगावनजीक जामदा डावा कालव्यात पाय घसरून पडला. पाण्याचा प्रवाहात तो वाहून गेला. त्याच्या सोबत असलेल्या खेडगाव व वेरुळी येथील तरुणांनी त्याचा शोध घेतला, मात्र उपयोग झाला नाही. रविवारी (दि.६) सकाळी साडेआठ ते नऊ वाजेच्या सुमारास ही घटना घडली.
सचिनचा शोध घेण्यासाठी डावा कालवा जामदा येथून रविवारी दुपारी पाण्याचा प्रवाह बंद करण्यात आला आहे. गिरणा धरणातून नदीत सोडल्या जाणाऱ्या पाण्याचे आवर्तन बंद करण्यात आले आहे, अशी माहिती पाटबंधारे विभागाचे अभियंता पी. टी. पाटील यांनी दिली. कालव्यातील पाण्याचा प्रवाह आज रात्री कमी झाल्यानंतरच तरुणाच्या शोधकार्यास मदत होणार आहे. वेरुळी येथील काही तरुण ५ रोजी सप्तश्रृंगगडाकडे पायी निघाले. संध्याकाळ झाल्याने ते खेडगाव येथे जामदा डावा कालव्यानजीक मराठी शाळेत मुक्कामासाठी थांबले. पहाटे उठल्यानंतर हातपाय धुण्यासाठी ते कालव्यावर गेले. यावेळी पाय घसरून सचिन कालव्यात पडला. पाण्याचा प्रवाह फुल्ल असल्यामुळे तो वाहत गेला. सोबतच्या मित्रांनी आरडाओरड केल्यानंतर नजीकच्या इंदिरानगरातील नागरिक धावून आले; पण त्याचा शोध लागला नाही. या ठिकाणी कालव्यावर धबधबा तयार केलेला असून, पाण्याचा प्रवाह वेगात असल्यामुळे शोधकामात अडथळा आला. यासंदर्भात भडगाव पोलिसांना माहिती देण्यात आली आहे.