तरुणाचा मृतदेह रेल्वे रुळावर; अपघात नव्हे, खुनाचा संशय, तिघांविरुद्ध गुन्हा
जळगाव खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – जळगाव शहरातील खेडी रोड परिसरात भांडण झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी एका ३१ वर्षीय तरुणाचा मृतदेह रेल्वे ट्रॅकवर आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. हा अपघाती मृत्यू नसून खून असल्याचा गंभीर आरोप मृत तरुणाची आई सौ. ज्योती प्रदीप भावसार यांनी पोलिसांकडे केला आहे. पोलिसांनी याप्रकरणी तीन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करून एकाला अटक केली असून, पुढील तपास सुरू आहे. मृत तरुणाचे नाव हर्षल प्रदीप भावसार (वय ३१, रा. दिनकर नगर) असे आहे.
सीसीटीव्हीमध्ये भांडण कैद
फिर्यादीनुसार, हर्षल १६ नोव्हेंबर रोजी रात्री ७.३० च्या सुमारास घराबाहेर गेला. रात्री उशिरापर्यंत घरी परत न आल्याने दुसऱ्या दिवशी सकाळी त्याचा शोध सुरू झाला. सकाळी त्याचा मृतदेह जळगाव-भादली तिसऱ्या रेल्वे लाईनवर आढळून आला. पोलिसांनी हा रेल्वेचा फटका लागून झालेला अपघात असल्याचे सांगितले. मात्र, हर्षलच्या मित्राने दिलेल्या माहितीनुसार, सीसीटीव्ही फुटेजमध्ये १६ नोव्हेंबर रोजी रात्री १० ते १०.३० च्या दरम्यान ओंकार हॉटेल (खेडी रोड) येथे हर्षलचे भुषण संजय महाजन व लोकेश मुकुंदा महाजन यांच्यासोबत भांडण झाल्याचे दिसून आले.
मारहाण करून रेल्वे रुळावर फेकल्याचा आरोप
या भांडणानंतर भुषण महाजन, लोकेश महाजन आणि परेश संजय महाजन या तिघांनी मिळून हर्षलला मारहाण केली आणि मोटारसायकलवर बसवून त्याला भादली तिसऱ्या रेल्वे लाईनवर नेऊन खून करण्याच्या हेतूने टाकून दिले, ज्यामुळे त्याचा रेल्वेच्या फटक्यात मृत्यू झाला, असा गंभीर आरोप आई ज्योती भावसार यांनी तक्रारीत केला आहे. मानसिक धक्क्यातून सावरल्यानंतर त्यांनी शनिपेठ पोलीस स्टेशनला येऊन तिन्ही आरोपींविरुद्ध मारहाण व खुनाचा संशय व्यक्त करत अधिकृत फिर्याद दाखल केली.शनिपेठ पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा नोंदवला असून, त्वरित कारवाई करत भुषण महाजन याला अटक केली आहे. उर्वरित दोन आरोपींचा शोध सुरू असून, पोलीस निरीक्षक साजीद मन्सुरी या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. तपासात आणखी महत्त्वाचे धागेदोरे मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.