अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी १३ डिसेंबरला नागपुरात धरणे आंदोलन
भुसावळ खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी — महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी समन्वय समितीच्या नेतृत्वाखाली राज्यातील अंगणवाडी सेविका व मदतनीस आपल्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी १३ डिसेंबर २०२५ रोजी नागपूर येथील यशवंत स्टेडियम, धनतोली येथे सकाळी ११ वाजता धरणे आंदोलन करणार आहेत.समन्वय समितीने प्रसिद्ध केलेल्या निवेदनानुसार, शासनाकडे अनेक वर्षांपासून पाठपुरावा करूनही अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मूलभूत व कायदेशीर हक्कांबाबतच्या मागण्या प्रलंबितच आहेत. त्यामुळे हिवाळी अधिवेशनादरम्यान नागपुरात धरणे आंदोलन करून सरकारचे लक्ष वेधण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
मुख्य मागण्या पुढीलप्रमाणे—
अंगणवाडी सेविका व मदतनीसांना शासकीय कर्मचारी दर्जा देऊन नियमित वेतन व भत्ते लागू करावेत.केंद्र सरकारने महागाईचा विचार करून मानधनात भरीव वाढ करावी.कामावर आधारित प्रोत्साहन भत्त्याऐवजी सरसकट दरमहा मानधनात वाढ करण्यात यावी.
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ग्रॅच्युटी लागू करावी.सेवेनंतर पेन्शनची व्यवस्था करावी. प्रणालीतील तांत्रिक अडचणी तातडीने दूर कराव्यात.मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या कामाचा थकित मोबदला त्वरित द्यावा.पंधरा दिवसांऐवजी एक महिना उन्हाळी सुट्टी देण्यात यावी.या मागण्यांबरोबरच इतर प्रलंबित विषयांवरही सरकारने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी समन्वय समितीचे निमंत्रक युवराज बैसाणे, संजय मापले, जयश्री वाबळे, रामकृष्ण बी. पाटील, पूनम निंबाळकर, गोवर्धन मिसाळ, रेखा चव्हाण, चंदा नवले, सत्यभामा रंगारी व राजू पाटील यांनी केली आहे.अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आंदोलन यशस्वी करावे, असे आवाहनही यावेळी करण्यात आले.

